मुंबईतील खड्ड्यांच्या समस्येवर मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांनी भाष्य केलं आहे. खड्ड्यांवर अजूनही 100 टक्के हमखास उपाय सापडलेला नाही. पण काँक्रिटीकरणामुळे खड्ड्यांचा प्रश्न बराचसा मार्गी लागू शकतो, असं विधान भूषण गगरानी यांनी केलं आहे. मुंबई महापालिकिने 300 किलोमीटरचे काँक्रिटचे रस्ते केले आहेत. मागच्या आणि या पावसाळ्यात या रस्त्यांवर एकही खड्डा पडला नाही. या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी आल्या नाहीत. काँक्रिटीकरण करावं की करू नये हा वेगळा विषय आहे. पण यावेळी खड्डयांच्या तक्रारी आल्या नाहीत. त्यामुळे पुढच्या दोन वर्षात 750 किलोमीटरच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. नियोजन झालंय. काम सुरू आहे, असं गगरानी यांनी स्पष्ट केलं.
टीव्ही 9 मराठीने आयोजित केलेल्या इन्फ्रा हाऊसिंग कॉन्क्लेव्हचं आयोजन केलं होतं. यावेळी भूषण गगरानी यांनी हे विधान केलं. मुंबई शहरात पूर्व द्रुतगती मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्ग वगळले तरी शहरात अंतर्गत 3 हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. या रस्त्यांची आपण देखभाल दुरुस्ती करतो. पाण्याचा निचरा, ड्रेनजची व्यवस्था करावी लागेत. मुंबईची भौगोलिक रचना, सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था आणि पडणारा पाऊस हे पाहता रस्त्यांचा दर्जा टिकवणं महत्त्वाचं आहे. वाहतूक कोंडीतून सुटण्यासाठी पूल तयार केले आहेत. कोस्टल रोड तयार केला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बरीचशी वाहतूक कोंडी दूर होत आहे. हा कोस्टल रोड वर्सोवा, दहिसर आणि भाईंदर पर्यंत नेण्याचं काम सुरू झालं आहे. दक्षिण आणि पश्चिम मुंबई लवकरच वाहतूक कोंडी मुक्त होणार आहे, असं भूषण गगरानी म्हणाले.
दक्षिण आणि मध्य मुंबईतील अनेक पुलांचं आयुष्य संपलं आहे. रेल्वेवरील पूल 100 वर्षापेक्षा अधिक जुने आहेत. त्यामुळे नवीन पूल करण्याशिवाय पर्याय नाही. टप्प्या टप्प्याने काम करत आहोत. पूल तोडून नव्याने बांधण्याचं काम दोन ते तीन वर्ष चालतं. वर्षाला फक्त सात महिने कामाला मिळतात. त्याकाळात वाहतूक नियोजन करावं लागतं. पोलिसांबरोबर सहकार्य करावं लागतं. ज्या ठिकाणी काम चालतं तिथे अडचणीचा सामना करावा लागतो. पूलामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते त्यामुळे तो तोडून काम करण्याशिवाय पर्याय नसतो, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी आम्ही पावसाळ्यात चांगलं नियोजन केलं होतं. मुख्यमंत्री स्वत: पालिकेच्या कंट्रोल रुममध्ये येऊन बसतात. राज्य सरकार आणि केंद्राच्या यंत्रणांनी चांगलं सहकार्य केलं. पूर्वनियोजन चांगलं होतं. यावेळी पावसाचं प्रमाण 110 टक्क्यापर्यंत होतं. शेवटचा पाऊस सोडला तर सर्व यंत्रणांच्या चांगल्या समन्वयामुळे आपण मुंबईकरांना चांगली सेवा देऊ शकलो. काही वेळा मुंबईची तुंबई झाली. पण पाणी साचणं यापेक्षा निचरा किती वेळेत होतो, वाहतूक यंत्रणा किती वेळात सुरू होतात हे महत्त्वाचं असतं. ते आम्ही यंदा करू शकलो, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आम्ही आता जिथे मेट्रो, तिथे बेस्ट बसची सुविधा देणार आहोत. रस्त्याचा दर्जा सुधारणे, रुंदी वाढवणे आदी गोष्टी करणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.