माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल विधान भवनात भेटले. दोघांनीही लिफ्टमधून प्रवास केला. दोघांनीही एकमेकांची विचारपूस केली. साधारण पाच मिनिटं ही भेट झाली. त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांना चॉकलेट दिलं. त्यामुळे उद्धव ठाकरे हे महायुतीत येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी या चर्चांना कालच पूर्णविराम दिला असला तरी आजही ही चर्चा सुरूच आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. आम्ही हात अपवित्र करून घेणार नाही. कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपबरोबर जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अनेकदा दिल्लीत पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्रीही आमच्या लिफ्टमध्ये असतात. महाराष्ट्राच्या विधान भवनात व्यवस्था अशी आहे की, एकत्रच लिफ्टने प्रवास करायचा असतो. एकाच सभागृहात जायचं असतं. दोन नेते समोरासमोर आले तर नमस्कार करणं हा शिष्टाचार असतो. त्या शिष्टाचारानुसार एकमेकांनी एकमेकांना नमस्कार केला असेल तर त्यात राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत पुन्हा हात मिळवणार नाही. आम्ही आमचे हात अपवित्र करून घेणार नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
तिन्ही पक्षाचे उमेदवार निवडून येतील
विधान परिषद निवडणुकीवरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी यात नकारात्मक बोलणार नाही. शेकापचे नेते भाई जयंतराव पाटील हे आमचे सहकारी आहेत. शेकापने आम्हाला सहकार्य केलं नाही या मताशी शिवसेना सहमत नाही. शेकापने अनेक ठिकाणी रायगड आणि हिंगोलीत किंवा जिथे जिथे त्यांची ताकद आहे, तिथे त्यांनी आम्हाला मदत केली. काही ठिकाणी दुर्देवाने पराभव झाला. त्याचं खापर आम्ही इतर घटक पक्षांवर फोडणार नाही. जयंतराव पाटील हे सुद्धा निवडून येतील विधान परिषदेत. आणि उद्धव ठाकरेंनी सांगितलं आम्ही उमेदवार देतोय तोही निवडून येईल. अशी रचना आम्ही करत आहोत, असं राऊत म्हणाले.
फुटलेला अर्थसंकल्प
राज्याचा आज अर्थसंकल्प आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. राज्याचा अर्थसंकल्प आधीच फुटला आहे. या सरकारने फोडला आहे. काही वर्तमानपत्रात या अर्थसंकल्पाची माहिती आली आहे. सरकारने कितीही घोषणा केल्या तरी काही होणार नाही. मोदी सरकारने सत्तेत येण्यापूर्वी अनेक घोषणा केल्या होत्या. पण त्यांना राज्यातील जनतेने स्वीकारलं नाही. यांना काय स्वीकारणार? असा टोला संजय राऊत यांनी लगावला.