23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे, निकालाला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. राज्यात दोन प्रमुख पक्षात पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यातच निकालानंतर आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजामुळे ही उत्सुकता आणखी वाढली आहे. कारण अनेक संस्थानी केलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुती किंवा महाविकास आघाडी असं कोणालाच स्पष्ट बहुमत मिळताना दिसून येत नाहीये. त्यामुळे आता निकालापूर्वीच दोन्ही गोटात घडामोडींना वेग आला आहे. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असणाऱ्या आमदारांची जुळवाजुळव कशी करयाची याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेते सातत्यानं बंडखोर उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांच्या संपर्कात आहेत.
अशा स्थितीमध्ये आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे तिसरी आघाडी काय भूमिका घेणार? तिसऱ्या आघाडीचा कोणाला पाठिंबा असणार? याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना बच्चू कडू यांनी मोठा खुलासा केला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून आम्हाला संपर्क करणं सुरू आहे. अद्याप आम्ही निर्णय घेतलेला नाही. एकदा कल हातात आला की आम्ही निर्णय घेऊ, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून आम्हाला संपर्क करणं सुरू आहे. अद्याप आम्ही निर्णय घेतलेला नाही. एकदा कल हातात आला की आम्ही निर्णय घेऊ, फोन दोन्हीकडून आलेले आहेत. पण आम्ही वेगळ्या सरकारचं स्वप्न पाहात आहोत. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते जसा संपर्क करत आहेत, तसाच आम्ही देखील संपर्क करत आहोत. माझ्या पक्षाचे ४ ते ५ उमेदवार निवडून येतील. आम्ही जी तिसरी आघाडी केली त्यांना घेऊन आम्ही सरकार बनवणार आहोत. कोणाला पाठिंबा देण्याऐवजी आपल्या सरकारचं स्वप्न पाहणं महत्वाचं वाटतं, पाठींब्याची वेळ येणार नाही.
एक्झिट पोलवर विश्वास नाही. एक्झिट पोल बोगस असतात. उद्याची वाट बघा कुणाला पाठिंबा देण्यापेक्षा आम्ही आमचं सरकार आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ही निवडणूक कुठल्या मुद्द्यांना धरून झालेली नाही. आम्ही काही मूलभूत मुद्द्यांना धरून ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तसं झाल नाही. ही निवडणूक स्थानिक पातळीवरचे उमेदवार, जात धर्म अशा मुद्द्यांना धरून झालेली आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.