नाशिक : घरातील वीज पुरवठा खंडित झाला तर लगेचच वीज कर्मचाऱ्यांना धारेवर धरणे, लाईट का गेली म्हणून जाब विचाराने आणि वेळ आलीच तर शिव्यांची लाखोली वाहणारेही आपल्याकडे कमी नाहीत. मात्र, वीज कर्मचाऱ्यांशी असं वागणाऱ्यांना एका कर्मचाऱ्याने आपल्या कृतीतून दिलेलं उत्तर संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वीज कर्मचारी योगेश वाघ याने हे काम केले आहे. जिगरबाज वायरमन म्हणून सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचं झालं असं की सिन्नरच्या वावी परिसरातील जवळपास 28 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यासाठी वीज कर्मचाऱ्यांना शेकडो फोन येऊ लागले होते, शेतकरी, व्यावसायिक यांच्यासह इतर नागरिक लाईट का गेली म्हणून विचारत होते. सकाळी आठ वाजेच्या दरम्यान वीज पुरवठा खंडित झाला होता.
त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी तातडीने वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण शोधण्यास सुरुवात केली होती. 33 केव्ही असलेल्या लाईन पासून हा वीजपुरवठा खंडित झाल्याचे निदर्शनास आले होते.
मात्र, फॉल्ट नेमका कुठे झाला याचा शोध लागत नव्हता. त्यासाठी वीज कर्मचाऱ्यांसह अधिकारी सकाळी-सकाळी शोध घेत होते, दुसरीकडे नागरिकांची विचारणा सुरूच होती.
याच दरम्यान 33 केव्ही लाइनवरच फॉल्ट निदर्शनास आला पण अडचण मोठी होती. ज्या विजेच्या पोलवर फॉल्ट झाला आहे तो पोल धरणाच्या मधोमध होता, त्यामुळे जाणार कसं असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
शंभर फुटापेक्षा जास्त अंतर होते, त्यात वीस फुट खोल धरण होते त्यामुळे फॉल्ट दुरुस्तीचे धाडस करण्यास कुणीही पुढे येत नव्हते, त्याचवेळी योगेश वाघ या वीज कर्मचाऱ्याने पुढाकार घेतला.
कमरेला दोरी बांधून पाण्यात उडी टाकली, पोहत जाऊन पोल गाठला, संपूर्ण शरीर ओले असतांना पोलवर चढणे ही अवघड होते, ते देखील वाघ यांनी यशस्वीपणे पूर्ण केले, आणि सकाळी खंडित झालेला वीजपुरवठा सुरू केला.
यामध्ये योगेश वाघ यांच्यासोबत सात ते आठ वीज कर्मचारी देखील सहकार्य करीत होते, मात्र, योगेश वाघ यांनी केलेले धाडसी कार्य चर्चेचा विषय ठरत असून कौतुक केले जात आहे.
त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर वीज कर्मचाऱ्यांना जाब विचारणाऱ्या किंवा शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या वाघ यांनी दिलेली चपराक महत्वाची मानली जात आहे.