यवतमाळ : ‘एक तीळ सात जणांनी वाटून खावा’ असा एक वाक्प्रचार आहे.अर्थ सरळ आहे. एखादी वस्तू एकट्यापुरती न ठेवता गरज असणाऱ्या सर्वांनाच द्यावी. सहकार्याची भावना ठेवावी. परंतु तीळ तर लहान असतो ? तो कसा वाटून खावा; असा प्रश्न कुणालाही पडतो. खाण्याचे जाऊ द्या, परंतु पुसद येथील अभिषेक सूर्यकांत रुद्रवार या कलावंताने एकाच तिळाचे ब्लेडच्या मदतीने 16 मिनिटे 20 सेकंदात चक्क शंभर तुकडे केले आणि त्यांना क्रमांकही दिले. त्याच्या या अभिनव कृतीची दखल घेत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आली. त्याचा पदक, प्रशस्तीपत्र, ओळखपत्र व पेन देऊन या संस्थेतर्फे गौरव करण्यात आला.
पुसद शहरातील विटावा वॉर्डातील अभिषेक सध्या नांदेड येथील एमजीएम कॉलेज मध्ये बीएफए अंतिम वर्षाला शिकत आहे. मुळात तो कलावंत आहे. मायक्रो आर्ट हा त्याच्या आवडीचा विषय आहे. त्याने आतापर्यंत मोहरी, तांदूळ, हराळी, सुपारी, खडू, पेन्सिल, माचीसची काडी यावर गणपतीचे चित्र रेखाटले आहे. तिळावर चक्क त्याने ए,बी,सी,डी यासारखे इंग्रजी मुळाक्षरे तर 1 ते 10 पर्यंतचे अंक लिहिले आहेत. तसेच पेन्सिलच्या टोकावर त्याच्या सूक्ष्म कलेतून माहूरची रेणुका माता, कोल्हापूरची देवी साकारली आहे.
‘एका तिळाचे शंभर तुकडे तुला का करावेसे वाटले?’ या प्रश्नाचे उत्तर देताना अभिषेकने’ एक तीळ सात जणांनी वाटून खावा’ हा वाक्प्रचार प्रेरणादायी ठरला, असे सांगितले. तिळाचे एवढे सूक्ष्म तुकडे आपण उघड्या डोळ्याने सहजतेने पाहू शकतो, असे तो म्हणाला. गेल्या चार पाच वर्षापासून सूक्ष्म कला त्यांनी जपली असून त्याचे आजोबा कृष्णा नाना नालमवार व आजी लीला यांच्या प्रोत्साहनाचा तो आवर्जून उल्लेख करतो.
त्याच्या कलेचे अनेक कंगोरे आहेत. वाळलेल्या पानांवर कटिंग करून बुद्ध, शिवराय यासारख्या महापुरुषांचे चेहरे साकारणे, एक रूपयाच्या नाण्यावर विविधरंगी निसर्ग चित्र रेखाटणे, आपट्याच्या पानावर सुरेख निसर्गरंग भरणे असा कलात्मक छंद अभिषेकने जोपासला आहे. याशिवाय जुन्या नाण्यांचा मोठा संग्रह अभिषेककडे आहे. तांदळाच्या दाण्यावर तो सहजतेने झेंडा रेखाटतो. संक्रांतीला तांदूळ दाण्यावर पतंग काढतो. विशेष म्हणजे अक्षरांमधून गणपतीचे रूप तो सहजतेने साकारतो. त्याने तयार केलेली अक्षरं गणपतीची रूपे अक्षरशः मनाला भुरळ पाडतात. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्यानंतर आता त्याला गिनीज बुक मध्ये विक्रमाची नोंद करावयाची आहे. त्या दृष्टीने त्याची तयारी सुरू आहे. नुकताच त्याचा बाबासाहेब नाईक चित्रकला महाविद्यालयात प्राध्यापक प्रदीप नागपुरे व प्राध्यापक जफर खान यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला .
अभिषेकने सूक्ष्म कलेत प्रावीण्य मिळविले आहे. बरेचदा कलावंत आर्थिक बाबीत उपेक्षित ठरतो. मात्र अभिषेकने या कलेचा उपयोग करत आर्थाजन केले आहे. या कलेतून आतापर्यंत मिळविलेल्या मिळकतीत शिक्षण पूर्ण केले आहे. त्याने तयार केलेली कलाकृती कर्नाटक, आंध्रप्रदेश ,दिल्ली राज्यात पोहोचली आहे. सूक्ष्म वस्तूवरील तयार केलेल्या गणपतीच्या विक्रीतून त्याला तीन ते चार लाख रुपये मिळालेले आहेत. कला केवळ आनंददायीच नव्हे तर आर्थिक आत्मनिर्भरता देणारी असावी, अशी अपेक्षा अभिषेकने बाळगली आहे.
इतर बातम्या :
माणसं ती माणसं जनावरही तसंच ! नेपाळी वाघिणीच्या प्रेमात भारतीय वाघानं रक्ताच्या बछड्याला संपवलं
दोन वर्षांनी गूढ उकललं, बाईक प्रवासात मालकाची कर्मचाऱ्याकडूनच हत्या, मृतदेह दरीत टाकला