यवतमाळ : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी महाराष्ट्राची संस्कृती (Culture of Maharashtra) जपली पाहिजे. ते नेहमीच द्वेष भावनेने वायफळ बोलत असतात. ब्राम्हण समाजाबद्दल केलेलं वक्तव्य चुकीचं आहे. एखाद्या समाजाबद्दल बोलणे जातीयवादी बोलून महाराष्ट्रातील सांस्कृतिक, धार्मिक वातावरण बिघडविण्याचं काम योग्य नाही. अमोल मिटकरी हे नवीन आहेत. सभागृहातदेखील नवीन आहेत. त्यांच्या वक्तव्याबद्दल त्यांनी ब्राम्हण समाजाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी केली. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे राज्याची संस्कृती बिघडविण्याचं काम करत आहेत. धार्मिक वातावरण बिघडविण्याचं काम करत आहेत, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
अमोल मिटकरी यांनी सांगली येथील एका सभेत लग्नातील विधीतील श्लोक म्हणून दाखविला. हनुमान चालीसाही म्हणून दाखविला. देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, यांची नक्कल करून दाखविली. उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केलं. पण, जोशात येऊन कन्यादानावरून भलतच वक्तव्य केलंय. लग्नातील विधीबाबत मिटकरी बोलत असताना उपस्थितांना हसू आवरलं नाही. जयंत पाटील आणि धनंजय मुंडे त्याठिकाणी होते. ते पोटभरून हसले. पण, हिंदुत्ववादी संघटनांनी मिटकरींच्या वक्तव्याचा कडाडून विरोध केला. ब्राम्हण महासंघही मिटकरींवर तुटून पडला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ठरल्याप्रमाणे राष्ट्रीय संघटन मंत्री यांची आजची भाजपची बैठक संघटनात्मक होती.
या सरकारने विदर्भावर अन्याय केला आहे. सरकार विरोधात वातावरण विदर्भात आहे. आगामी काळामध्ये सरकारला कसे उत्तर द्यावे. या सरकार विरोधात कसे काम करावे यासाठी बैठक होती. आगामी काळात आंदोलन करणे आणि पक्ष प्रवेश करणे पक्ष बांधणीसाठी ही बैठक असल्याचे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.