विवेक गावंडे, Tv9 मराठी प्रतिनिधी, यवतमाळ : राज्यातील पालकमंत्री पदाची यादी काल जाहीर झाली. यात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांची यवतमाळ व वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड करण्यात आली. यासंदर्भात बोलताना मंत्री संजय राठोड म्हणाले, माझ्याकडे दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्यासाठी प्राधान्य देणार आहे. सर्व पालकमंत्र्यांनी नियोजनाचा भाग पाहायचा आहे. यवतमाळ आणि वाशिम या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी, सिंचन, आरोग्य , वीज असे विविध प्रश्नांचे नियोजन करू. या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा हा विचाराच सोनं लुटण्याचा दिवस आहे. खरी शिवसेना कोणती हा विषय न्यायालयाकडं प्रलंबित आहे. या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना प्रमुख कार्यकर्त्यांना विचार द्यायचे. हा विचार घेऊन लोकं काम करायचे.
मधल्या काही दिवसांत आपण पाहिलं आम्ही हिंदुत्वाच्या विचारावर शिवसेनेमधून 40 आमदार आणि इतर दहा आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो. बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित असलेल्या हिंदुत्व विचाराची युती आम्ही केली. सरकार स्थापन केलं. महाराष्ट्र प्रगतीपथावर नेणं हे आव्हान आहे.
राज्यातील शेतकरी,शेतमजूर, विद्यार्थी, व्यापारी या सर्वांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्या दृष्टीनं मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सर्व मंत्री काम करणार आहोत. ही भूमिका एकनाथ शिंदे हे दसरा मेळाव्याच्या माध्यमातून मांडतील.
या दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने शिवसैनिक येतील. हे एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकायला येणार आहेत. विकासा संदर्भातील मार्गदर्शन एकनाथ शिंदे करणार आहेत.