यवतमाळ : गेल्या पंधरा दिवसांपासून यवतमाळ शहरातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. ऐन जून महिन्यात पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. अमृतची पाईपलाईन फुटल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामूळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. हातपंपावर महिलांसह पुरुष मंडळीची मोठी गर्दी दिसत आहे. तर रोज मोलमजूरी करणाऱ्या महिलांना रात्री-अपरात्री कुपनलिकेवर पाण्यासाठी जावे लागत आहे. पाण्याच्या या परिस्थितीमुळे आता पाणी भरावं की, रोज मजूरी करावी असा प्रश्न आता नागरिकांपुढे निर्माण झाला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील रहिवाशांना नळाला पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना बोअरवेल व हातपंपाचे पाणी पिऊन तहान भागवावी लागत आहे.
दरम्यान, या भागांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचवण्यासाठी जीवन प्राधिकरण विभागाने टाकलेल्या पाण्याच्या पाईपलाईनचा मोठा भाग 26 मे रोजी दत्त चौक परिसरात फुटल्याने पाईपमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले आहे.
जीवन प्राधिकरण विभागाच्यावतीने दत्त चौकात फुटलेल्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू करण्यात आले. मात्र अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा पाच दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली. त्यामुळे कालावधी संपूनदेखील पाईपलाईन दुरुस्त झाली नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
या परिस्थितीतमध्ये दत्त चौकातून जाणारी पाईपलाईन फुटण्यापूर्वीच खोजा कॉलनी, पिंपळगाव, वडगाव, वंजारी फैल, वैभवनगर येथे राहणाऱ्या नागरिकांची आता पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली होती. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आजवर कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. या भागात मागील 15 दिवसांपासून पाण्यासाठी ओरड सुरू असल्याचेही नागरिकांनी सांगितले आहे.
नुकताच जून महना चालू झाला आहे मात्र मान्सून लांबल्याने आता राज्यातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आता तरी पाण्याची सोय करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.