यवतमाळ | दुपारची शांत वेळ. रस्त्यावर फार गर्दी नाही. तुम्ही निवांतपणे गाडीवरून जात असाल अन् अचानक खाडकन् रस्ता उखडावा. क्षणभरात त्यातून पाण्याचा भला मोठा फवारा बाहेर यावा.. हे काय घडतंय, कळण्याच्या आतच रस्त्यावर पाणीच पाणी.. जणू काही नदीच… यवतमाळमध्ये अशी घटना घडली. विशेष म्हणजे रस्त्यावरच असल्याने बाजूच्या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही भयंकर दृश्य कैद झाली. या घटनेत रस्त्यावरू जाणारी एक युवती गंभीर जखमी झाली. यवतमाळमध्ये (Yawatmal) अमृत पाणी योजना फिसकटल्यामुळे ही गंभीर आणि अक्षम्य घटना घडल्याचं म्हटलं जातंय. या विचित्र प्रकारामागे नेमकी कुणाची चूक आहे, याचा शोध घेतला जात आहे.
यवतमाळ शहरातील यवतमाळ विदर्भ हौसिंग सोसायटीच्या माइंदे चौक ते दिल्ली हाऊसच्या रस्त्यावर सदर घटना घडली. रस्त्याच्या खाली असलेली जलवाहिनी अचानक फुटली आणि डांबरी रस्ता उखडून पाण्याचा फवारा प्रचंड वेगाने बाहेर आला. हे पाणी दोन फुट हवेत उडालं. जलवाहिनी फुटताच पाण्याचा फवारा रस्त्याच्या डिव्हाडरपर्यंत गेला. यामुळे रस्त्यावर लाखो लीटर पाणी वाया गेलं. क्षणात रस्त्याला नदीचं स्वरुप आलं. ही घटना घडली तेव्हा एक युवती रस्त्यावरून दुचाकीवरून चालली होती. अचानक रस्ता फुटून तुफान वेगाने पाणी बाहेर आलं. त्यामुळे युवतीचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि ती खाली कोसळली. या घटनेमुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडला.
यवतमाळमध्ये अमृत पाणी पुरवठा योजनेत अत्यंत निकृष्ठ दर्जाचं साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप केला जातोय. आजच्या या घटनेमुळे सोशल मीडियातून तुफ्फान चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या घराजवळच ही घटना घडली. हे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.