अनेकजण आपल्या नातेवाईकांना किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याला रेल्वे स्टेशनपर्यंत सोडण्यासाठी जातात. काही लोक तर आपल्या कुटुंबातील सदस्यांचं सामान घेऊन त्याला सोडण्यासाठी थेट त्याने ज्या कोचमध्ये आपलं सीट आरक्षीत केलं आहे, तीथंपर्यंत देखील पोहोचतात. त्यानंतर ते आपल्या अप्तजनाला सीटवर बसून त्याचं सामान तिथे ठेवून नंतर ट्रेनमधून परततात.काही जण तर ट्रेनमध्येच प्रवास करणाऱ्या आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या कुटुंबातील व्यक्तीचे चरणस्पर्श करून पाया पडतात, आणि नंतर ट्रेनमधून बाहेर पडतात.मात्र तुम्ही जर वंदे भारत सारख्या ट्रेनमध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांचे चरणस्पर्श करण्यासाठी थांबला असाल तर तुम्हाला त्यांच्या पाया पडणं महागात पडू शकतं, असे अनेक प्रकार समोर आले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
अनेक जण आपल्या कुटुंबातील सदस्याला किंवा नातेवाईंकाना सोडण्यासाठी वंदेभारत ट्रेनमध्ये चढतात. सोबत असलेलं सामान ठेवल्यानंतर त्या सदस्यांच्या पाया पडण्यासाठी तीथे थांबतात. मात्र तोपर्यंत ट्रेनचा दरवाजा बंद होतो. त्यानंतर ट्रेनचा दरवाजा थेट दुसऱ्या स्टेशनलाच उघडतो. यादरम्यान जर संबंधित व्यक्तीला टीसीनं पकडलं तर त्यांच्याकडून मोठा दंड वसूल केला जातो, असे काही प्रकार समोर आल्यानंतर आता यासंदर्भात रेल्वेकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.
उत्तर मध्य रेल्वेचे प्रयागराज मंडळाचे जनसंपर्क अधिकारी अमित कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार वंदेभारत एक्स्प्रेसमध्ये अशाप्रकारचे अनेक प्रकरणं समोर आले आहेत. प्रवाशांना सोडण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्यासोबत येतात. मात्र ते ट्रेनमधून उतरण्यापूर्वीच अनेकदा वंदेभारत ट्रेनचा दरवाजा बंद होतो. तो दरवाजा ऑटोमॉटिक असल्यामुळे तो थेट पुढच्या स्टेशनलाच उघडतो. यादरम्यान जर एखाद्या अशा व्यक्तीला टीसीने पकडलं तर त्याच्याकडे तिकीट नसतं, त्यामुळे त्याच्याकडून रेल्वे प्रशासन दंड वसूल करते. या सर्वांमध्ये एक रंजक गोष्ट अशी की ज्या व्यक्तींना दंड झाला त्यातील अनेकांचं एकच कारण होतं, ते म्हणजे ज्या प्रवाशाला सोडण्यासाठी आलो त्याचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेत होतो, तोपर्यंत ट्रेनचे दरवाजे बंद झाले.
दरम्यान असे प्रकार टाळण्यासाठी आता रेल्वेकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे, नव्या नियमावलीनुसार जर एखाद्या व्यक्तीकडे तिकीट नसताना तो वंदेभारत ट्रेनमध्ये पकडला गेला आणि त्याने जर असं काही कारण सांगितलं तर ते ग्राह्य धरणं जाणार नाही, त्याच्याकडून योग्य तो दंड वसूल केला जाईल. त्यामुळे कोणीही आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी आले असता ट्रेनमध्ये न थांबण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.