पब्लिसिटी तुमची, पण जीव जातो आमचा…इच्छुक उमेदवाराचे बॅनर काढताना शॉक लागून तरूणाचा मृत्यू

| Updated on: Oct 17, 2024 | 8:00 AM

राजकीय प्रसिद्धीसाठी शहरात ठिकठिकाणी लावण्यात येणारे बॅनर नागरिकांसाठी धोकादायक ठरत असल्याचे समोर आले आहे. अशाच एक दुर्दैवी घटनेत एका 25 वर्षांच्या तरूणाचा शॉक लागून मृत्यू झाला.

पब्लिसिटी तुमची, पण जीव जातो आमचा...इच्छुक उमेदवाराचे बॅनर काढताना शॉक लागून तरूणाचा मृत्यू
बॅनर ठरत आहेत धोकादायक
Image Credit source: tv9
Follow us on

विधानसभा निवडणुकांचे रणशिंग आता फुंकले गेले असून महिन्याभरात राज्यात नवे सरकार स्थापन होईल. निवडणूक आयोगाने नुकतीच पत्रकार परिषद घेत राज्यातील निवडणुकांची कारीख जाहीर केली. त्यानुसार येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल. निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यभरात, तसेच विविध सहरांत पक्षांचे लागलेले बॅनर्सही उतरवण्यात येत आहेत. मात्र राजकीय प्रसिद्धीसाठी शहरात ठिकठिकाणी लावण्यात येणारे बॅनर नागरिकांसाठी धोकादायक ठरत असल्याचे समोर आले आहे. अशाच एक दुर्दैवी घटनेत एका 25 वर्षांच्या तरूणाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्यामध्ये हा दुर्दैवी प्रकार घडलाय. तेथे पावशे या इच्छुक उमेदवाराचा बॅनर लावण्यात आला होता, मात्र तो उतरवण्याचे काम सुरू असताना एका तरूणाला वीजेचा जबर धक्का लागला आणि त्याचा मृत्यू झाला. यामुळे स्थानिकांत संतापाचे वातावरण आहे.

नेमक काय झालं ?

मिळालेल्या माहितीनुसर, ही घटना कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील श्रीराम चौक येथील असून, या दुर्घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सोहेल अनिल भिंगारदिवे (वय 25) असे मृत तरुणाचे नाव असून, तो बॅनर काढण्यासाठी नेहमीप्रमाणे काम करत होता. बॅनरच्या लोखंडी साखळ्या आणि वायरच्या नजीकच्या संपर्कामुळे त्याला जबरदस्त शॉक लागला, ज्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या घटनेने राजकीय बॅनर लावण्याच्या अनियंत्रित प्रथेविरुद्ध नागरिकांमध्ये रोष निर्माण केला आहे.

विशाल पावशे हे कल्याण पूर्व विधानसभा मतदार क्षेत्रात शिंदे गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, त्यांनी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा बॅनर लावला होता, परंतु त्यांच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. स्थानिकांनी या घटनेनंतर आवाज उठवत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

“शहरातील राजकीय बॅनरचे अनियंत्रित लावणे थांबवले पाहिजे, जेणेकरून अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत,” असे अनेकांचे मत आहे. तर सुरक्षेची उपाययोजना न करता बॅनर लावणे आणि काढणे हे किती धोकादायक ठरू शकते, हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. या प्रकरणी प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

विशाल पावशे काय म्हणाले ?

ज्या इच्छुक उमेदवाराचा बॅनर काढताना ही दुर्दैवी घटना घडली त्या विशाल पावशे यांनी या दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते काम ( बॅनर काढण्याचं) काम ठेकेदाराला दिलं होतं. पण जी घटना घडली तो एक दुर्दैवी अपघात आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान मात्र राजकीय लोकांच्या प्रमोशनसाठी लावलेले बॅनर आणि कमानी लोकांच्या जीवासाठी धोकादायक ठरत असून कधीही अपघात होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.