पुणे : 29 ऑगस्ट 2023 । राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आमदार महादेव जानकर आणि भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे मैत्रीपूर्ण संबंध याची आजही चर्चा होते. त्या मैत्रीपूर्ण संबंधामुळेच महादेव जानकर यांनी भाजपची साथ देण्याचा निर्णय घेतला. राज्यात कॉंग्रेस राष्ट्रवादीची सत्ता उलथवून टाकण्यात महादेव जानकर यांचा महत्वाचा वाट होता. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून जानकर यांनी राज्यात रान पेटवून भाजपची सत्ता आणण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या कामगिरीमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात महादेव जानकर यांना मंत्री पद देण्यात आले होते.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप मोठा पक्ष म्हणून विजयी झाला. पण, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी स्थापन करत मुख्यमंत्री पद मिळविले. त्यानंतर अडीच वर्षात भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून राज्यात सत्ता आणली. मात्र, या मंत्रीमंडळातून महादेव जानकर, सदाभाऊ खोत यासारखे जुने सहकारी यांना वगळले. त्यामुळे जानकर सध्या भाजपवर बरेच नाराज आहेत.
पुणे येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या मेळाव्यात बोलताना महादेव जानकर यांनी भाजप आणि कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. राष्ट्रीय समाज पक्षाचे विधानसभेतील आमदार रत्नाकर गुट्टे तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्रात कारभार करायचा आहे. भाजपने ठरवलं होतं महादेव जानकरचा एकही आमदार निवडून येऊ द्यायचा नाही, पण, आम्ही नसतो तर तुमचा मुख्यमंत्री झाला नसता असा इशारा त्यांनी भाजपला दिला.
आपल्या विचाराचं सरकार या देशात आणायचे आहे. भाजप सर्वच घटक पक्षाना त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवायला सांगत होते, पण, मी स्वाभिमानी आहे. मी रासपच्या चिन्हावर निवडणूक लढलो. आम्ही जर दोस्ती करत आहोत तर दोस्तांसारखं वागा असा इशारा भाजपला दिला.
राज्यात 48 लोकसभेची तयारी करा. भाजप आणि काँग्रेस यांची नियत एकसारखी आहे. राज्यात भाजप, कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या चार पक्षांपासून सावध रहा. तुमची मोठी पार्टी आहे मग इतर पक्ष का फोडता असा सवाल त्यांनी भाजपला केला. महादेव जानकर हा शेवटचा राजकारणात असणार, माझा पुतण्या किंवा इतर कुणी राजकारण नसणार असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.