जालन्यातून मोठी बातमी समोर येत आहे. क्रिकेट खेळताना मैदानातच खेळाडूचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विजय पटेल असं या 32 वर्षीय तरुणाचं नाव आहे. समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार षटकार मारण्याच्या प्रयत्नात असताना तो जमिनीवर कोसळला आणि त्यानंतर लगेचच त्याचा मृत्यू झाला. हृदय विकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी शहरातील ‘फ्रेजर बॉईज’ या मैदानावर ख्रिसमस निमित्त क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत हा तरुण सहभागी झाला होता. या तरुणाची बँटिंग सुरू असताना हा तरुण मैदानावरच कोसळला. त्यानंतर विजय पटेल याला आयोजकांनी तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केलं. विजय पटेल यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
विजय पटेल हा मुंबईच्या जवळ असलेल्या नालासोपारा येथील खेळाडू आहे. ख्रिसमस निमित्त जालना शहरातील ‘फ्रेजर बॉईज’ या मैदानावर क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत विजय पटेल हा देखील सहभागी झाला होता. मात्र त्यावेळी हा सामना आपल्या आयुष्यातील शेवटचा सामना असेल याची कल्पाना देखील त्याला नव्हती. तो मोठ्या उत्साहानं या स्पर्धेत सहभागी झाला होता. परंतु बॅटिंग सुरू असतानाच जो जमिनीवर कोसळला, त्यांनंतर आयोजकांनी तातडीनं त्याला रुग्णालयात दाखल केलं. परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केलं. त्याला हार्ट अटॅक आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये.
विजयच्या मृत्यूनं हळहळ
क्रिकेट खेळणाऱ्या एका 32 वर्षीय तरुणाचा डोळ्या देखत ग्राऊंडवरच मृत्यू झाला. या घटनेनं उपस्थितांंना चांगलाच धक्का बसला आहे. विजयच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्याचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्यानं झाल्याचं बोललं जात आहे, मात्र अद्याप नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये.