महाराष्ट्रातील पुणे शहरात एक डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे डॉक्टर पुण्यातील एरंडवणे भागातील रहिवासी आहेत. डॉक्टरांना ताप आणि अंगावर पुरळ उठले होते. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाने त्यांच्या रक्ताचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) येथे तपासणीसाठी पाठवले. त्यांच्या अहवालामध्ये डॉक्टरांना झिका व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांना संसर्ग झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील अन्य पाच सदस्यांचे रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले. यामध्ये त्यांच्या 15 वर्षांच्या मुलीला संसर्ग झाल्याचे समोर आले. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
झिका विषाणू संक्रमित एडिस डास चावल्यामुळे पसरतो. डेंग्यू आणि चिकुनगुनिया या सारख्या संसर्ग पसरवण्यासाठी देखील डासांसारखीच ही प्रजाती जबाबदार मानली जाते. 1947 मध्ये युगांडामध्ये हा विषाणू पहिल्यांदा सापडला. शहरात ही दोन प्रकरणे समोर आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने देखरेख सुरू केली आहे. परिसरात इतर कोणतेही संशयित रुग्ण नसले तरी अधिकाऱ्यांनी डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.
राज्याच्या आरोग्य विभागाने डासांचे नमुने गोळा केले आहेत. परिसरातील सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, परिसरातील गर्भवती महिलांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. झिका व्हायरसमुळे कोणतीही गंभीर समस्या उद्भवत नाही. परंतु, एखाद्या गर्भवती महिलेला संसर्ग झाला असेल तर तिच्या गर्भामधील बाळावर त्याचा परिणाम होऊ शकतो असे या अधिकाऱ्याने सांगितले.
झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त पिल्याने डासांना झिका विषाणूची लागण होते. हेच डास अन्य व्यक्तींना चावल्यास त्यांना झिकाची लागण होते. पावसाळ्यामध्ये साचलेले पाणी यामुळे डास वाढतात. हे डास चावल्याने डेंग्यू, हिवताप, चिकनगुन्या सारखे आजार होतात. मात्र, झिकाचा रुग्ण सापडल्याने अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.