नवी दिल्ली : जागतिक आर्थिक घडामोडींचा संमिश्र परिणाम भारतीय शेअर बाजारावर (Indian share market) दिसून आला. सेन्सेक्स व निफ्टी मध्ये मोठी तेजी नोंदविली गेली. सेन्सेक्स 1500 हून अधिक अंकाच्या वाढीसह बंद झाला. निफ्टीनं 16250 अंकांचा टप्पा पार केला. शेअर बाजारात आज (शुक्रवारी) चौफेर खरेदीच चित्र दिसून आलं. निफ्टी वर बँक आणि फायनान्शियल निर्देशांक (Bank and Financial Index) 2.5 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविली गेली. मेटल निर्देशांकात 4 टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली. फार्मा, एफएमसीजी आणि (Realty Shares) रिअल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदीचा जोर राहिला. सेन्सेक्स 1534 अंकांच्या तेजीसह 54,326.39 च्या स्तरावर बंद झाला. निफ्टी 457 अंकांच्या वाढीसह 16266 च्या टप्प्यावर पोहोचला. सेन्सेक्स वरील 30 पैकी सर्व 30 शेअर्समध्ये तेजी नोंदविली गेली.
आजच्या सर्वाधिक वधारणीच्या शेअर्समध्ये (DRREDDY) डॉ.रेड्डी, (RELIANCE) रिलायन्स, (NESTLEIND) नेल्सेइंडिया, (TATASTEEL) टाटा स्टील, (LT) एलटी, (AXISBANK) अक्सिस बँक, (INDUSINDBK) इंड्सइंड बँक आणि (SUNPHARMA) सन फार्मा यांचा समावेश होतो.
औषधनिर्माण क्षेत्रातील अग्रणी Dr. Reddy’s Laboratories (DRL) च्या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. आजच्या व्यवहारादरम्यान शेअरचा भाव 7.5 टक्क्यांच्या वाढीसह 4224 रुपयांवर पोहोचला. काल (गुरुवारी) शेअर 3929 रुपयांवर बंद झाला होता. डॉ.रेड्डीचे आर्थिक तिमाही अहवाल गुरूवार प्रकाशित करण्यात आले होते. कंपनीच्या महसूलात वार्षिक आधारावर 15 टक्क्यांसह 5437 कोटींची वाढ नोंदविली गेली होती. अर्थजाणकारांच्या मते कंपनीच्या विकासाचा वेगाची क्षमता आगामी काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.
आघाडीच्या ब्रोकिंग फर्मने वाढीचा अंदाज वर्तविलेल्या स्टॉक्समध्ये एलआयसी हाउसिंग फायनान्स समावेश आहे.समाधानकारक कामगिरीमुळे गुंतवणुकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. एलआयसी हाउसिंगच्या तिमाही अंदाजात कंपनीच्या नफ्यात 180 टक्क्यांनी वाढ नोंदविली गेली आहे. एलआयसी हाऊसिंग स्टॉक्समध्ये 5 टक्क्यांहून अधिक तेजी नोंदविली गेली. आजच्या व्यवहारादरम्यान स्टॉक 374 च्या टप्प्यावर पोहोचला. कंपनीच्या वाढीचा दर समाधानकारक असल्यामुळे 40 टक्के परताव्याची शक्यता ब्रोकिंग फर्मने वर्तविली आहे.