प्रवासावर असलेले निर्बंध हटवून आता बरेच दिवस झालेत आणि बरेच दिवस वर्क फ्रॉम होम केल्यानं जीवनात आलेला मरगळपणा दूर करण्यासाठी मेघा आता परदेश दौऱ्यावर जाण्याचा विचार करू लागलीय. मात्र, कोरोनानंतर सर्वात मोठं आणखी एक नुकसान झालंय ते म्हणजे विमानाचे तिकिट महाग झालेत.
कोरोनापूर्वी मेघा विचार करत होती की कमी बजेटमध्ये परदेशात फिरून यावं. मात्र आता विमानाच्या भाड्यामध्येच ट्रिपचे अर्ध पैसे संपून जातील. अशावेळी परदेश दौऱ्याचं स्वप्न पूर्ण कसं करावं? याबाबत मेघा विचार करू लागली. ट्रिपवर बजेटपेक्षा जास्त खर्चही होणार नाही तसेच ट्रिपचा पूर्ण आनंदही घेता येईल.
तुम्ही फॉरेन ट्रिपची प्लॅनिंग करत असाल किंवा अशाच द्विधा मनस्थितीत असाल तर आमचा हा खास रिपोर्ट तुमच्यासाठी आहे
परदेशात प्रवासाला जाणं हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं, योग्य प्रकारे नियोजन केल्यास फॉरेन टूरचे स्वप्न प्रत्यक्षात येते.
परदेश दौऱ्याचं योग्य नियोजन कसं करावं ?
परदेशी दौऱ्यातील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात महाग बाब म्हणजे विमानाचं तिकीट. तर सर्वात आधी विमानाच्या तिकीटाचं टेंशन दूर करूयात.यासाठी प्रवासाच्या काही महिने अगोदरच विमानाच्या तिकीटं बुक करा.
विशेषत: अशा दिवशी जाण्याचं आणि येण्याचं तिकीट बुक करा ज्या दिवशी तिकिटाचे दर हे सर्वात स्वस्त असतील. याशिवाय skyscanner, momondo, trivago, tripadvisorसारखे अनेक अॅप्स आणि वेबसाईटस आहेत त्यावर तुम्ही तिकीट दरांची तुलना करून स्वस्तात विमानाचं तिकीट बुक करू शकता.
याशिवाय तुम्ही क्रेडिट कार्डचे रिवार्ड पॉईंट्स आणि एअर माईल्सचा वापर करून विमानांच्या तिकीटांवर सवलत मिळवू शकता.
राहण्याचा आणि खाण्याचा खर्च कमी कसा करावा ?
विमानाच्या तिकीटांचा प्रश्न सुटल्यानंतर आता परदेशात गेल्यानंतर सर्वात जास्त खर्च राहण्यासाठी आणि खाण्यासाठी होतो. तर या प्रश्नाचंही उत्तर आहे.
जर तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत जात असाल तर AirBnb सारख्या साईट्सचा वापर करून तुम्ही एखादी संपूर्ण प्रॉपर्टी बुक करू शकता. त्यामुळे खर्चात खूप बचत होते. जर तुम्ही एकटेच परदेश वारीवर जात असाल तर बॅकपॅकर्स हॉस्टेलमध्ये खूप स्वस्तात राहू शकता.
परदेशात गेल्यानंतर प्रवासावरही मोठ्या प्रमाणात खर्च होतो. प्रवासाचा खर्च कमी करण्यासाठी पर्सनल कार किंवा कॅब न घेता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा.
परदेशात विशेषत: अमेरिका आणि युरोपमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप चांगलं आणि आरामदायक आहे. अनेक देशांमध्ये कॉमन ट्रॅव्हल कार्डची सुविधा देखील आहे त्यामुळे सर्वच पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये तुम्ही आरामशीरपणे प्रवास करू शकता.
अशाच प्रकारे BlaBlaCar, Lyft, Mobicoop सारखे अनेक राईड शेअरिंग ऍप उपलब्ध आहेत. या ऍपचा वापर करून तुम्ही राईड शेअर करून पैसे वाचवू शकता.
परदेशी चलनावर होणारा खर्च हाही एक मोठा खर्च परदेश दौऱ्यात असतो. परदेशात जाऊन करेन्सी एक्सचेंज करणं महागात पडते,त्यामुळे भारतातच करनेन्सी एक्सचेंज करून परदेशातील प्रवासाला जा .
तसेच तुमच्यासोबत जास्त पैसे बाळगू नका. अशावेळी फॉरेक्स कार्ड उपयोगी ठरतात.
फॉरेक्स कार्ड एक प्रीपेड कार्ड आहे . या कार्डमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार त्या देशाचं चलन ठेवता येतं.
या कार्डाचा वापर जगभरात करता येतो आणि फॉरेक्स कार्डमुळे फॉरेन एक्सचेंज रेटमधील चढ आणि उतारामुळे रुपयांचं जे अवमूल्यन होते त्यापासून देखील सुटका होते.