नवी दिल्ली | 25 जुलै 2023 : परदेशात जाऊन स्थायिक होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या वर्षी 26 जूनपर्यंत 87,026 लोकांनी आपल्या भारताला कायमचा टाटा केला आहे. आणि त्यांनी परदेशी नागरिकत्व पत्करले आहे. गेल्या तेरा वर्षांत तब्बल साडे सतरा लाख लोकांनी आपला देश सोडून परदेशाचा आसरा घेतला आहे. भारत सोडून संपन्न देशात जाण्याचा कल समजू शकतो. परंतू भारतीय नागरिकता सोडून कफल्लक समजले जाणाऱ्या श्रीलंका, पाकिस्तान अशा देशांतही जाणारेही लोक काही कमी नाहीत.
भारतातील लोक परदेशातील शिक्षणाच्या सोयी आणि बुद्धीला योग्य न्याय मिळण्यासाठी बहुतांशी जात असतात. परदेशातील नोकरी आणि डॉलरमधील वेतन त्यांना भुलवित असते. गेल्या तेरा वर्षांत ( 2011 ते 2023 ) 17.50 लाख लोकांनी भारतीय नागरिकता सोडली आहे आणि ते परदेशात जाऊन वसले आहेत. हेनली प्रायवेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2023 प्रसिद्ध झाला आहे. त्यात भारत सोडणाऱ्या नागरिकांची आकडेवारी आली आहे. त्यात भारत सोडण्यामागील कारणेही दिली आहेत.
भारत सोडून संपन्न देशात जाण्याचा कल समजू शकतो. भारतीय नागरिकता सोडून म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका आणि चीनचे नागरिकत्व भारतीय पत्करीत आहेत. भारताला सोडून सर्वाधिक लोकांची पसंती अमेरिकत जाऊन स्थायिक होण्यासाठी असते. सात लाख लोक अमेरिकेत जाऊन वसले आहेत. त्याशिवाय ब्रिटन, रशिया, जपान, इस्रायल, इटली, फ्रान्स, युएई, युक्रेन, न्युझीलंड, कॅनडा, जर्मनी सारख्या देशात भारतीय लोकांचा ओढा असतो. काही जणांनी युगांडा, पापुआ, न्यू गिनी, मोरक्को, नायजेरीया, नॉर्वे, जाम्बिया, चिली सारख्या देशांचा सहारा घेतला आहे.
भारत सोडणाऱ्यांमध्ये श्रीमंतांची संख्या कमी आहे, भारत सोडणारे बहुतांशी लोकं ही नोकरपेशा मंडळी आहेत. नागरिकता सोडणाऱ्यांमध्ये करोडपती भारतीयांची संख्या अडीच टक्के आहे. तर 97.5 टक्के लोक नोकरपेशा असल्याचे डॉ. आदित्य पटेल यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणतात की चांगल्या करीयरच्या संधी त्यांना खुणावत असतात. काही जण छोट्या देशांची निवड यासाठी करतात की तेथे टॅक्स कमी असतो, व्यापाराच्या अधिक संधी असतात. तसेच पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेशा सारख्या देशात वैयक्तिक कारणापायी जात असतात.
भारतात दुहेरी नागरिकत्वाचा कायदा नाही. त्यामुळे दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारताच भारतीय नागरिकत्व त्याग करावे लागते. गेल्या काही वर्षांत याचे प्रमाण वाढले आहे. साल 2010 पर्यंत वार्षिक सरासरी सात टक्के इतकी होती. तर आता हे प्रमाण 29 टक्के झाले आहे. बहुतांश मंडळी नोकरीसाठी परदेशात जातात. तेथील सुविधांमुळे तेथेच स्थायिक होतात. हे स्थलांतर रोखण्यासाठी भारत सरकारने पावले उचलली आहेत. मेक इन इंडीया मोहिमेंतर्गत करीयरचे चांगले पर्याय तयार केले जात आहेत. याचा परिणाम हळूहळू जाणवत असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी संसदेत स्पष्ठ केले आहे.
कोरोना काळानंतर साल 2022 मध्ये सर्वाधिक 2.25 लाख लोकांनी देश सोडला. कोरोनाकाळात 2020 मध्ये 85 हजार तर 2021 मध्ये 1.63 लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडून कायमचे परदेशात वास्तव्य करणे सुरु केले असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने संसदेत कीर्ति चिदंबरम यांनी विचालेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.
अनुक्रमे साल 2011 – 1,22,819 , साल 2012 -1,20,923, साल 2013-1,31,405, साल 2014-1,29,328, साल 2015-1,31,489,साल 2016-1,41,603, साल 2017-1,33,049, साल 2018-1,34,561, साल 2019-1,44,017,साल 2020 – 85,256, साल 2021-1,63,370, साल 2022-2,25,620, साल 2023- 87,026 असे एकूण गेल्या तेरा वर्षांत एकूण 17,50,466 भारतीय देश सोडून गेले आहेत.