अहमदाबाद | 21 ऑक्टोबर 2023 : गुजरातमध्ये नवरात्रीचा गरबा खेळताना हार्ट अटॅकने 17 वर्षांच्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या 24 तासांत गरबा खेळताना हार्ट अटॅक आल्याने 10 जणांचा मृत्यू झाला आहे. ताजे प्रकरण खेडा येथील कपडवंज येथील आहे. गरबा खेळताना वीर शाह या सतरा वर्षीय तरुणाच्या नाकातून रक्त येऊ लागले. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. शारीरिकदृष्ट्या सुदृढ असलेल्या वीर यांने नवरात्रीच्या सहाव्या दिवसाच्या गरब्यात सहभाग घेतला आहे.
वीर शाह याची तब्येत खराब झाली तेव्हा त्याचे आई-वडील दुसऱ्या मैदानात गरबा खेळत होते. वीरचे वडील रिपल शाह यांना याची कल्पना दिली. या घटनेने त्यांना जबर मानसिक धक्का बसला. रिपल शाह यांनी तरुणांना गरबा खेळताना स्वत:ची काळजी घ्या, खेळताना सलग खेळू नका अधून मधून ब्रेक घ्या असा सल्ला दिला आहे. गुजरातसह देशभरात नवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे.
गरबा खेळताना तरुणांचे हार्टअटॅकने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात वेगवेगळ्या घटनांत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. नवरात्रीत सहा दिवसात 108 इमर्जन्सी एम्ब्युलन्सला आलेले 521 कॉल केवळ हार्टअटॅकसंबंधी तसेच दम लागण्यासंबंधी आले होते. वीर शाह याच्या मृत्यूपूर्वी अहमदाबाद येथे 24 वर्षांच्या तरुणाचा गरबा खेळताना अचानक कोसळून जागीच मृत्यू झाला. तसेच बडोदा येथे 13 वर्षीय मुलाचा मृत्यू गरबा खेळताना हार्टअटॅकने झाल्याचे सांगण्यात येते. तसेच कपडवंज येथील 17 वर्षांच्या सगीर याचा ही मृत्यू गरबा खेळताना हार्टअटॅकने झाला. बडोद्याच्याच 55 वर्षीय व्यक्तीचा सोसायटीत गरबा खेळताना हार्टअटॅक आल्याने झाला. राजकोट येथेही गरबा खेळताना दोन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
गेल्याकाही दिवसांपासून गरबा खेळताना होत असलेल्या मृत्यूच्या घटनामुळे आता गरबा आयोजकांनी मंडपात वैद्यकीय कक्ष उभारून त्यात डॉक्टर तसेच एम्ब्युलन्सची व्यवस्था केली जात आहे. गरबा महोत्सवाच्या शेजारील आरोग्य केंद्रांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गरबास्थळी एम्ब्युलन्स वेगाने प्रवेश करता येईल असा मोकळा कॉरीडॉर तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
खेळताना पाणी कमी पिण्याचे प्रमाण, जेवणात मिठाचा जादा वापर, उच्च रक्तदाब, अपुरी झोप आणि अनुवांशिक कारणाने हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. गरबा खेळताना मोकळ्या जागी खेळावा, ती जागा हवेशीर असावी, कर्मचाऱ्यांना सीपीआरचे प्रशिक्षण असावे, गरब्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी, तसेच ज्यांना हार्टची समस्या किंवा ब्लडप्रेशरचा त्रास असणाऱ्यांनी जास्त वेळ गरबा खेळू नये असे डॉक्टरांनी म्हटले आहे.