मुंबई | 25 नोव्हेंबर 2023 : देशातील पहिली हाय स्पीड ट्रेन धावण्यासाठी 100 किमीचा एलिवेटेड मार्ग तयार करण्यात आला आहे. याशिवाय 250 किमीचा एलिवेटेड मार्ग बांधण्यासाठी खांब उभारण्याचे काम संपुष्ठात आले आहे. मुंबई ते अहमदाबाद हायस्पीड प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून देशातील हा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. पहिल्या टप्प्यात गांधीनगर बुलेट ट्रेन चालविण्याची योजना आहे. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने ( NHSRCL ) पहिल्या 1 किमीचे काम 6 महिन्यात पूर्ण केले होते. त्यानंतर 50 किमीचे काम 10 महिन्यात तर पुढील 50 किमीचे काम म्हणजे एकूण 100 किमी एलिवेटेड मार्गाचे काम करायला 6 महिन्यांचा कालावधी लागला आहे.
NHSRCL ने या प्रकल्पाचा काम करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचं वापर केला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर देशात प्रथमच केला जात आहे. देशात प्रथमच 40 मीटर लांबीचा फुल स्पॅनचे ( ब्रीजचा सर्वात छोटा भाग ) बॉक्स तयार केले जात आहेत, या स्पॅनला लॉंच करण्यासाठी फुल स्पॅन लॉंचिंग तंत्र आणि स्पॅन बाय स्पॅन लॉंचिंग सेगमेंटचा वापर एकत्र केला जात आहे. मेट्रोसाठी जे ब्रिज तयार केले जातात, ज्या तंत्राने स्पॅन लॉंचींग केले जाते, त्यापेक्षा हे बुलेटचे स्पॅन दहापट वेगाने लॉंच होत आहेत.
येथे पाहा व्हिडीओ –
Progress of Bullet Train project:
Till date: 21.11.2023
Pillars: 251.40 Km
Elevated super-structure: 103.24 Km pic.twitter.com/jW10QLPfv6— Western Railway (@WesternRly) November 25, 2023
जपानच्या बुलेट ट्रेन शिंकानसेन मध्ये वापरले जाणारे रिइन्फोर्स्ड कॉंक्रीट ( RC ) ट्रॅक सिस्टीमचे ट्रॅक बेड टाकण्याचे काम सुरतमध्ये सुरु झाले आहे. देशात प्रथमच असे रुळ टाकले जात आहेत. 100 किमीचा एलिवेटेड ( उन्नत स्वरूपाचा ) मार्ग बांधताना सहा पुलांची देखील निर्मिती केली आहे.आता ट्रेनचा आवाज रोखण्यासाठी वायाडक्टवर नॉइज बॅरियर लावले जात आहेत. वलसाड जिल्ह्यात 350 मीटर लांबीचा डोंगरातील बोगदा खणून पूर्ण झाला आहे.सुरतमध्ये 70 मीटरचा पहिला स्टील पुल बांधला आहे. मुंबई ते अहमदाबाद ( MAHSR ) या मार्गावर बांधल्या जाणाऱ्या 28 स्टील पुलांपैकी हा पहिला आहे.