केरळ : आधुनिक काळात नवनवीन चमत्कार घडत असतात. एका क्षणात मोठमोठ्या इमारती नष्ट केल्या जातात. किंवा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने इकडून तिकडे हलविल्या जातात. आता केरळ येथील हजार वर्षे पुरातन असलेले देवस्थान कुट्टनाड मनकोंबू भगवती मंदिर हे पुरापासून वाचण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सहा फूट उंच उचलल्यात यश आले आहे. या अवघड कामासाठी सुमारे साडे तीन कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे.
स्थापत्य आणि तंत्रज्ञानाचा वापर करीत केरळातील अलप्पुझा येथील मनकोम्बू श्रीभगवती मंदिराला अतिवृष्टीत पावसाच्या पुरामुळे वाचविण्यात यश आले आहे. या सुमारे 1000 वर्षे जुने असलेल्या पुरातन मंदिराच्या ढाच्याला कोणताही धक्का न लावता. स्क्रु जॅकचा वापर करीत हे मंदिर सहा फूट उंच करण्यात यश आले आहे. या प्रक्रियेसाठी सुमारे चारशे स्क्रु जॅकचा वापर करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाढत्या शहरीकरणामुळे मंदिराची उंची हळूहळू कमी होत गेल्यामुळे ते सखल भागात गेले होते. त्यात साल 2018 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत येथे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने परिस्थिती आणखीनच कठीण बनली. पाणी साचल्याने दैनंदिन पूजा पूर्ण करण्यात धोका निर्माण झाला होता. मध्य केरळमधील कुट्टनाड परिसरातील असलेल्या प्रमुख मंदिरांपैकी एक असलेले हे मंदिर समुद्रसपाटीपासून खाली आहे.
साल 2018 च्या अतिवृष्टीत साचलेल्या पाण्यामुळे देवीच्या मूर्तीपर्यंत पाणी गेले, मंदिराचा परिसर वर्षभर पाण्याच्या खाली बुडाल्याने भक्तांची खूपच गैरसोय झाली. त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने (टीडीबी) मंदिराची पुरातन रचना कायम ठेवत मंदिराला आधुनिक तंत्राच्या सहाय्याने उंच उचलण्यास परवानगी दिली. अखेर मंजुरी मिळाल्यानंतर समितीने कोचीस्थित अभियांत्रिकी फर्म EDSS ला हे अवघड काम सोपविले. या मंदिराला त्याच्या गर्भगृहासह उचलण्यासाठी स्क्रू जॅकचा वापर करीत पृष्ठभागापासून मंदिर सुमारे 1.8 मीटरवर उचलण्यात आले.
फर्मचे सीईओ जोस फ्रान्सिस यांनी न्यू इंडियन एक्सप्रेसला सांगितले की हे मंदिर उचलण्यासाठी 400 स्क्रू जॅक वापरण्यात आले आणि मंदिराचा गर्भगृह ठेवण्यासाठी 18 खांब आणि बीम बांधण्यात येणार आहेत. प्रत्येक खांब 27 मीटर खोल ड्रील केला जाणार आहे. या मंदिराची उंची वाढविली असली तरी कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत हे मंदिर टिकून राहणार आहे. या जागेवर इतर बांधकाम उभारण्याचाही समितीचा विचार आहे.