केरळमध्ये टेंपल फेस्टिव्हल दरम्यान दुर्घटना, फटाक्यांच्या आतिषबाजीदरम्यान 150 जखमी, 8 गंभीर

| Updated on: Oct 29, 2024 | 8:59 AM

केरळमधील कासारगोड येथील एका मंदिरात एका कार्यक्रमादरम्यान फटाक्यांच्या साठ्यात मोठा स्फोट झाला. त्यामुळे लागलेल्या भीषण आगीत 150 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहे तर 8 जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. मंदिराजवळील एका दुकानात फटाके ठेवण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. याला अचानक आग लागून ही दुर्घटना घडली.

केरळमध्ये टेंपल फेस्टिव्हल दरम्यान  दुर्घटना, फटाक्यांच्या आतिषबाजीदरम्यान 150 जखमी, 8 गंभीर
केरळमधील दुर्घटनेत 150 हून अधिक जखमी
Image Credit source: PTI
Follow us on

केरळमध्ये दिवाळीपूर्वीच मोठी दुर्घटना घडली आहे. केरळमधील कासरगोड येथे टेंपल फेस्टिव्हलदरम्यान आतिषबाजी सुरू असताना मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत 150 हून अधिक लोक जखमी झाले असून त्यापैकी 8 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. सोमवारी रात्री ( 28 ऑक्टोबर) नीलेश्वरम जवळील एका मंदिरात ही दुर्दैवी घटना घडली.

अपघातानंतर जखमींना लगेचच कासारगोड, कन्नूर आणि मंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. चिंताजनक परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांसह जिल्हा प्रशासनाचे उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या दुर्दैवी घटनेतील बाधितांना मदत देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. वीरकावू मंदिराजवळील एका दुकानात फटाके ठेवण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याच फटाक्यांना अचानक आग लागली, त्यामुळे हा अपघात झाला असावा असा कयास आहे. घटनास्थळी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांसह जिल्हा प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित असून बचावकार्य सुरू आहे.

 

पोलिसांनी काय सांगितलं ?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंजुतांबलम वीरारकवू मंदिरात वार्षिक कालियाट्टम उत्सव साजरा केला जात होता. या कार्यक्रमासाठी फटाक्यांची ऑर्डर देण्यात आली होती. ते एका स्टोरेजमध्ये सुरक्षित ठेवले होते. दरम्यान, रात्री 12.30 च्या सुमारास अचानक तेथे मोठा स्फोट झाला. आणि तेथील सर्व फटाक्यांनी एकामागोमाग एक असा पेट घेतला, ते फुटू लागले आणि तेथे भीषण आग लागली.

त्यावेळी आसपासच्या परिसरात मोठी गर्दी होती. मात्र घटनेचा मुलाहिजा न राखता, परिस्थिती काय आहे ते न पाहताच अनेकांनी त्या आगीचं व्हिडीओ शूटिंग करण्यास सुरूवात केली. बघता बघता आग भडकली आणि 150 हून अधिक लोक आगीच्या विळख्यात सापडले, होरपळले. जखमींपैकी 8 जणांची प्रकृती अतिशय गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच फायरर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी दाखल झाले. बऱ्याच प्रयत्नांती आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अनेक वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. जखमींना सर्वतोपरी मदत केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. यासोबतच स्थानिक लोकांनीही जखमी आणि पीडितांच्या मदतीसाठी धाव घेतली.