कथित मद्यविक्री घोटाळाप्रकरणी अटकेची कारवाई झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळाला नाहीत. ईडीने अटक केलेल्या केजरीवाल यांना शुक्रवारी राऊस अव्हेन्यू कोर्टाने 6 दिवसांचची अर्थात 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी ठोठावली. गुरूवारी केजरीवाल यांना त्यांच्या निवासस्थानाहून अटक करण्यात आली होती. याप्रकरणातील आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. अरविंद केजरीवाल यांना गुरूवारी रात्रभर ईडीच्या कार्यालयात राहावं लागलं. या केसमध्ये आतापर्यंत आम आदमी पार्टीचे तीन मोठे नेते तुरुंगात आहेत. यामध्ये मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि सत्येंद्र जैन यांचा समावेश आहे.
अबकारी धोरण प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने 26 फेब्रुवारी 2023 रोजी 8 तासांच्या चौकशीनंतर दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली होती. त्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना ईडीने अटक करून तुरुंगात पाठवले होते. या प्रकरणात ईडीने कथित हवाला व्यवहाराच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेल्या सत्येंद्र जैन यांचीही चौकशी केली होती.
2 नोव्हेंबर 2023 ला पाठवलं पहिलं समन्स
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याबद्दल बोलायचं झालं तर याप्रकरणी ईडीने याप्रकरणी 2 नोव्हेंबर 2023 रोजी केजरीवाल यांना पहिलं समन्स पाठवलं होतं. ईडीचे समन्स बेकायदेशीर असल्याचे सांगत केजरीवाल यांनी या सुनावणीला उपस्थित राहण्यास नकार दिला होता. यानंतर ईडीने त्यांना वारंवार समन्स पाठवलं पण केजरीवाल हे पुन्हापुन्हा सुनावणीसाठी हजर राहण्यास नकार देत तपास यंत्रणेला दोष देत राहिले. ईडीने केजरीवाल यांना 9 वेळा समन्स बजावले. दुसरे समन्स ईडीने 21 डिसेंबर 2023 रोजी, तिसरे 3 जानेवारी, चौथे 18 जानेवारी, पाचवे 2 फेब्रुवारी, सहावे 19 फेब्रुवारी, सातवे 26 फेब्रुवारी, आठवे 4 मार्च आणि 21 मार्च रोजी 9 वं समन्स दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलं.
हायकोर्टातूनही दिलासा नाहीच
ईडीतर्फे पाठवण्यात आलेल्या 9 नऊ समन्सला विरोध करत केजरीवाल हे उच्च न्यायालयात पोहोचले, मात्र तेथून त्यांना दिलासा मिळाला नाही. यानंतर 10व्या समन्ससह गुरूवारी रात्री ईडीचे अधिकारी केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी त्यांच्यासोबत सर्च वॉरंटही होता. त्यांनी केजरीवाल यांच्या घराची झडती घेतली, चौकशी केली आणि अखेर रात्री नऊ च्या सुमारास केजरीवाल यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना ईडीच्या मुख्यालयात नेले. केजरीवाल यांना रात्रभर ईडीच्या कार्यालयात राहावं लागलं. पहिला समन्स पाठवल्यापासून 142 दिवसांनंतर केजरीवाल यांच्यावर ईडीची पकड घट्ट झाली आणि आता ते तपास यंत्रणेच्या ताब्यात आहेत.
शुक्रवारी ईडीने केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टासमोर हजर केलं. ईडीकडून अरविंद केजरीवाल यांच्या 10 दिवस कोठडीची मागणी करण्यात आली. ईडीच्या वतीने सहाय्यक सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी युक्तिवाद केला. तर केजरीवाल यांच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी, विक्रम चौधरी आणि रमेश गुप्ता यांनी काम पहात केजरीवाल यांच्या अटकेला विरोध करत ही फसवणूक असल्याचे म्हटले आहे. 10 दिवसांच्या कोठडीची मागणी ही केजरीवाल यांच्या वकिलांनी फेटाळण्याची विनंती कोर्टापुढे केली.
28 मार्चपर्यंत ईडी कोठडी
शुक्रवारी संध्याकळी न्यायालयाने याप्रकरणी निर्णय जाहीर केला. कोर्टाने केजरीवाल यांतच्या वकिलांची मागी फेटाळून लावत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना 6 दिवसांची अर्थात 28 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली. त्यामुळे आता 28 मार्च पर्यंत केजरीवाल हे ईडीच्या कोठडीत असतील आणि चौकशीला सामोरे जातील. याप्रकरणाची पुढील सुनावणी आता 28 मार्च रोजी दुपारी होईल.
केजरीवाल यांना ईडीच्या कोठडीत पाठवताना न्यायालयाने काही अटीही घातल्या. ईडीतर्फे जेव्हाही अरविंद केजरीवाल यांची चौकशी करण्यात येईल तेव्हा ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असतील, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. कॅमेऱ्यातील फोटो आणि व्हिडिओ सुरक्षित ठेवावे लागतील. यासोबतच केजरीवाल यांना त्यांच्या वकिलाला दिवसातून 1 तास भेटता येईल. केजरीवाल हे त्यांची पत्नी सुनीता आणि त्यांचे स्वीय सचिव विभव कुमार यांनाही दररोज अर्धा तास भेटू शकतात.
ईडीचे कोर्टात केजरीवालांवर नेमके आरोप काय ?
मद्य घोटाळ्यातील अरविंद केजरीवाल मुख्य सूत्रधार आहेत. अरविंद केजरीवालांना निवडणुकीत फंड हवा होता. मद्य घोटाळा 100 नाही तर 600 कोटींचा आहे. गोवा निवडणुकीत मद्य घोटाळ्याचा पैसा वापरला गेला. गोव्याच्या निवडणुकीत 45 कोटी रुपये खर्च करण्यात आले. गोव्याला 4 मार्गांनी पैसे पाठवले, यासाठी हवालाचाही वापर झाला. केजरीवालांनी इतर नेत्यांशी मिळून हा कट रचला, असा आरोप ईडीने आपल्या युक्तिवादातून केजरीवालांवर केला.