Heavy Rain: हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार; 24 तासात 22 ठार 6 जण बेपत्ता; सरकारकडून मदत जाहीर

| Updated on: Aug 21, 2022 | 7:01 AM

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे सगळं जनजीवन विस्कळीत झाले आहे. भूस्खलनामुळे हाहाकार माजला असून गेल्या 24 तासांत 22 जणांचा मृत्यू, तर 12 जण जखमी झाले आहेत, तर 6 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे.

Heavy Rain: हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार; 24 तासात 22 ठार 6 जण बेपत्ता; सरकारकडून मदत जाहीर
Follow us on

मंडीः हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे हाहाकार माजला आहे. गेल्या 24 तासांत 22 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण गंभीर जखमी झाले आहेत, तर 6 जण बेपत्ता आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे की, मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) राज्यात पूरस्थिती, भूस्खलन आणि अपघात सुरूच आहेत. मंडी जिल्ह्यात (Mandi District) मुसळधार पावसाने रस्ते जलमय झाले असून शिमला जिल्ह्यातही परिस्थिती बिकट आहे. शोघी आणि तारा देवी दरम्यान सोनू बांगला येथे दरड कोसळली आहे. भूस्खलनामुळे शिमला-कालका हा राष्ट्रीय महामार्ग-5 ब्लॉक झाला आहे. जोरदार पावसामुळे दगड कोसळण्याचे प्रकार अजूनही सुरुच आहेत. या मार्गावरील वाहतून शोघी मेहली बायपासवरून वळवण्यात आली आहे.


राज्याच्या हवामान खात्याचे संचालक बुई लाल यांनी सांगितले की, येत्या पाच दिवसांत राज्यात मध्यम आणि मुसळधार पाऊस कोसळणार आहे. संपूर्ण राज्यात पुढील 12 तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून 24 ऑगस्टपर्यंत उर्वरित दिवसांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुख्यमंत्री जय राम ठाकूर राज्यातील या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही सांगण्यात आले आहे. भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीमुळे मुख्यमंत्र्याकडून मदत जाहीर करण्यात आली असून हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाईल असं अश्वासन देण्यात आले आहे.

बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु

मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सर्व जिल्ह्यांतील उपायुक्त आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागात तातडीने मदत, बचाव आणि पुनर्वसन कार्य सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, एनडीआरएफ आणि राज्य बचाव पथकांना मदत आणि बचाव कार्यासाठी अपघातस्थळी पाठवण्यात आले असून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे.

पर्यटकांनी खबरदारी घ्यावी

मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांच्याकडून स्थानिक लोकांना तसेच पर्यटकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भूस्खलन आणि पूर येण्याची शक्यता असलेल्या भागांपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भूस्खलन आणि पुरामुळे झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त करण्यात आले आहे. घटनास्थळी मदतकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंडी जिल्ह्यात अचानक आलेल्या पुरामुळे घरांमध्ये पाणी शिरले असून त्यामुळे काही नागरिक गावातच अडकले आहेत. या परिसरातील वाहने पाण्यात बुडाल्याने प्रचंड नुकसान झाले असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.