मुंबई | 26 नोव्हेंबर 2023 : वर्ष 2008. नोव्हेंबर महिन्यातील 26 तारीख. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन. पाकिस्तानातून समुद्र मार्गे दहशतवादी दाखल झाले. त्यांनी या स्टेशनवर निष्पापांचे बळी घेतले. त्यांनी स्टेशनवर अंधाधूंद गोळीबार केला. त्यात जवळपास 50 नागरिकांना जीव गमवावा लागला. यामध्ये 100 जण जखमी झाले. मुंबईत मोठ्या प्रमाणात तपास सत्र, छापेमारी करत या दहशतवाद्यांना टिपण्यात आले. ताज हॉटेलमध्ये त्यांना यमसदनी पाठविण्यात आले. शहीद तुकाराम ओंबळे यांनी कसाब याला जीवंत पकडले. या हल्ल्यातील अनेकांनी मृत्यू जवळून पाहिला. अनेकांच्या मनपटलावर त्याच्या खोल जखमा झाल्या.
अजमल कसाबविरोधात साक्ष
दहशतवादी अजमल कसाब याच्याविरोधात मुंबई न्यायालयात सुनावणी झाली. त्याच्याविरोधात 9 वर्षांच्या मुलीने साक्ष दिली. त्यावेळी सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली. देविका रोतावन असे तिचे नाव आहे. दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यावेळी ती स्टेशनवर होती. तिच्या पायाला गोळी लागली होती. तिने या सर्व दहशतवाद्यांना पाहिले होते.
संघर्ष अजून संपलेला नाही
न्यायालयात देविका ही सर्वात कमी वयाची साक्षीदार होती. तिने कसाबला ओळखले होते. मीडियात तिचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. कुबड्या घेऊन ती न्यायालयात अनेकदा आली. सुनावणीला हजर झाली. देशाच्या शत्रूविरोधात तिने हिम्मतीने साक्ष दिली. पण तिचा संघर्ष अजून संपलेला नाही. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, देविका आता लाजाळू राहिलेली नाही. ती आता थेट उत्तर देते. ती आता 24 वर्षांची आहे. तिच्या कुटुंबियांना सरकारने आठ वर्षांत 13 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली. पण या कुटुंबाची आर्थिकस्थिती चांगली नाही. ती नोकरीच्या शोधात आहे. तिच्या वडिलांच्या हाताला काम नाही.
आयपीएस व्हायचे स्वप्न
देविका पूर्वी चाळीत राहत होती. पुनर्विकासातंर्गत तिला एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट मिळाला. पण त्यासाठी तीला 19 हजार रुपये भाडे भरावे लागते. देविका पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे. ती गेल्या अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात आहे. पण तीला प्रत्येकवेळी अपयश हाती येत आहे. आयपीएस अधिकारी होऊन दहशतवाद संपविण्याचे तिचे स्वप्न आहे. ते स्वप्न तीने जीवंत ठेवत संघर्ष सुरु ठेवला आहे.