नागालँड | गुरुवार 2 मार्च खऱ्या अर्थाने गाजला तो पुण्यातील पोटनिवडणूक आणि 3 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाने. नागालँडमध्ये महाराष्ट्राच्या दोन पक्षांचा डंका वाजलाय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं तिथं 7 तर केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री असलेल्या रामदास आठवले यांच्या रिपाइंने 2 जागा जिंकल्या आहेत. या तिन्ही राज्यातले निकाल कसे राहिले, हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
ईशान्येकडच्या ३ राज्यांपैकी भाजपनं पुन्हा एकदा दोन राज्यात सत्ता मिळवलीय. त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या 3 राज्यांचे निकाल स्पष्ट झाले. याआधी त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपची सत्ता होती. तिथं भाजपनं सत्ता राखलीय. तर मेघालयात कॉनरॉड संगमांची एनपीपी पार्टी सर्वात मोठी ठरलीय. त्यांनी सरकार बनवण्यासाठी भाजपची मदत मागितल्याचा दावा केलाय.
त्रिपुरात एकूण 60 जागा होत्या, त्यापैकी भाजप आणि मित्रपक्षानं 34, डावे आणि काँग्रेस आघाडीनं 14 तर पहिल्यांदाच निवडणुका लढवणाऱ्या टीएमपी अर्थात टिपरा मोथा पक्षानं ११ जागा घेतल्या आहेत.
त्रिपुरात गेल्यावेळी भाजप आणि आयपीएफटी आघाडीनं 44 जागा जिंकून त्रिपुरात सत्ता आणली होती. यावेळी भाजप आणि मित्रपक्षानं सत्तेत कमबॅक केलं असलं तरी १० जागा कमी झाल्या आहेत.
काँग्रेसनं यावेळी डाव्यांसोबत आघाडी केल्यामुळे त्रिपुरात खातं उघडलंय. काँग्रेसचा गेल्यावेळी एकही आमदार नव्हता. यावेळी 3 जागा काँग्रेसनं जिंकल्या आहेत. त्रिपुरात 2018 मध्ये काँग्रेसला फक्त 1.79 टक्के मतदान होतं. यावेळी ते 8.6 टक्के झालंय.
नागालँडच्या 60 पैकी 40 जागा मिळवत भाजप आणि मित्रपक्षानं सत्ता राखलीय. काँग्रेसला गेल्यावेळे प्रमाणे यावेळीही नागालँडमध्ये एकही आमदार जिंकवून आणता आलेला नाही.
मेघालयमध्ये मात्र सत्तेचं गणित आकड्यांमध्ये फसलंय. कॉनरॉड संगमांची एनपीपी पार्टी 59 पैकी 26 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनलीय. भाजपनं 3, काँग्रेसनं 5 तर टीएमसीनं 5 जागा मिळवल्या आहेत. संगमांच्या पार्टीला सत्तेसाठी अजून ५ आमदारांची गरज आहे., माहितीप्रमाणे त्यांनी भाजपची मदत मागितली आहे.
काँग्रेसला मात्र मेघालयात मोठं नुकसान झालंय. मेघालयात काँग्रेसचे 2018 मध्ये 21 आमदार होते. यावेळी 16 जागांचं नुकसान होत फक्त ५ जागा राखता आल्या आहेत.