अयोध्या | 11 जानेवारी 2024 : 1986 मध्ये पती देवकीनंदन अग्रवाल यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांनी आपले जीवन प्रभू रामाला समर्पित केले. बहुतेक वेळ त्यांनी तीर्थयात्रेवर घालवला. 1992 मधील ती घटना. अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली. त्या दिवशी त्यांनी एक अत्यंत कठीण अशी शपथ घेतली. ही शपथ होती मौनव्रत पाळण्याची. ज्या दिवशी ज्या दिवशी राम मंदिराचे उद्घाटन होईल त्या दिवशी मौनव्रत सोडू ही त्यांची शपथ होती. आता 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन होत आहे. त्याच दिवशी त्यांचे हे मौनव्रत संपणार आहे. यासाठी त्या झारखंड येथून अयोध्येला निघाल्या आहेत.
झारखंडमधील धनबादचे येथील रहिवासी असलेल्या या 85 वर्षीय वृद्ध महिलेचे नाव आहे सरस्वती देवी. त्यांना एकूण आठ अपत्य आहेत. पतीच्या निधनानंतर त्यांनी प्रभू रामचंद्र यांच्या सेवेसाठी आपले पुढील आयुष्य समर्पित केले. 1992 मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली त्याचदिवशी सरस्वती देवी यांनी राम मंदिराचे उद्घाटन होईल तेव्हाच मौनव्रत सोडू अशी शपथ घेतली. त्यानंतर सुमारे तीस वर्ष त्यांनी आपले व्रत मोडले नाही अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
सरस्वती देवी यांनी त्या घटनेनंतर अनेकदा अयोध्येला भेट दिली. अयोध्येत त्यांना ‘मौनी माता’ म्हणून ओळखले जाते. कुटुंबातील सदस्यांशी त्या सांकेतिक भाषेतून संवाद साधतात. लेखनाद्वारे लोकांशी बोलतात. पण, त्यात काही गुंतागुंतीची वाक्ये असतात. 2020 पर्यंत त्या दररोज दुपारी फक्त एक तास बोलत असत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराची पायाभरणी केली त्यादिवसापासून त्यांनी दिवसभर मौन पाळले आहे.
सरस्वती देवी यांचा धाकटा मुलगा 55 वर्षीय हरेराम अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडली तेव्हा आईने अयोध्येत राम मंदिर निर्माण होईपर्यंत मौन बाळगण्याची शपथ घेतली. पण, आता राम मंदिरात अभिषेकाची तारीख जाहीर झाली तेव्हापासून ती खूप आनंदी आहे. सोमवारी रात्री त्या धनबाद रेल्वे स्थानकावरून गंगा सतलज एक्सप्रेसने अयोध्येला निघाल्या आहेत आणि 22 जानेवारीला ती मौनव्रत सोडणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
सरस्वती देवी सध्या त्यांच्या दुसरा मुलगा नंदलाल अग्रवाल यांच्यासोबत धनबाद येथील धैया येथे राहत आहे. नंदलाल यांची पत्नी इनू अग्रवाल यांनी सांगितले की, लग्नाच्या काही महिन्यांनंतर त्यांनी सासूला भगवान रामाच्या भक्तीमध्ये मौनव्रत पाळताना पाहिले. आम्हाला त्यांची बरीचशी सांकेतिक भाषा समजत असली तरी त्या ज्या काही लिखित स्वरूपात बोलत. पेन आणि कागदाच्या माध्यमातून त्या संवाद साधतात. पण, ती भाषा कठीण शब्दात असते असे त्यांनी सांगितले.