भोपाळ गॅस दुर्घटना इतिहासातील सर्वात मोठी दुर्घटना मानली जाते. या दुर्घटनेत कारखान्यातून विषारी वायूची गळती झाल्याने साडे पाच हजाराहून अधिक लोकांचा झोपेतच मृत्यू झाला होता.
या दुर्घटनेला जबाबदार असलेला आणि सध्या खंडहर बनून उभा असलेल्या यूनियन कार्बाईड कारखान्यातून सुमारे ३३७ टन धोकादायक कचऱ्याला हटविण्याची प्रक्रिया या दुर्घटनेच्या चाळीस वर्षांनंतर बुधवारी अखेर सुरु झाली आहे.
रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विषारी कचऱ्याने भरलेले १२ कंटेनर ट्रक भोपाळहून दूर २५० किमी अंतरावर धार जिल्ह्याच्या पीथमपूर औद्योगिक क्षेत्रात रवाना केले गेले. हा कचरा घेऊन १२ कंटेनर ट्रक रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास न थांबता रवाना केले असून या वाहनांसाठी खास ग्रीन कॉरीडॉर तयार केला आहे. सात तासात हे ट्रक धार जिल्ह्याच्या पीथमपूर औद्योगिक क्षेत्रात पोहचण्याची आशा असल्याचे भोपाळ गॅस गुर्घटना मदत आणि पुनर्वसन विभागाचे संचालक स्वतंत्र कुमार सिंह यांनी सांगितले.
रविवारी सुमारे १०० कर्मचाऱ्यांनी सुमारे ३० मिनिटांच्या शिफ्टमध्ये काम करुन कचरा पॅक करुन ट्रकमध्ये लोड केला. त्यांच्या आरोग्याची तपासणी केली गेली. त्यांना दर अर्ध्या तासांनी आराम दिला गेला असेही स्वतंत्र कुमार सिंह यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी आदल्या दिवशी सकाळी प्रसारमाध्यमांना सांगितले की सर्वकाही जर ठरल्यानुसार झाले तर हा विषारी कचरा तीन महिन्याच्या आत जाळला जाईल. अन्यथा या कामास नऊ महिन्यांचा कालावधी देखील लागण्याची शक्यता आहे.सुरुवातीला कचऱ्याचा काही भाग पीथमपूर येथील कचऱ्यातील डेपोत नष्ट केला जाईल. त्यानंतर राखेची तपासणी करुन यात काही हानिकारक तत्व तर राहिले नाही ना याची पुन्हा तपासणी केली जाणार असल्याचे स्वतंत्र कुमार सिंह यांनी सांगितले.
साल 1984 मध्ये 2 आणि 3 डिसेंबरच्या रात्री यूनियन कार्बाईड किटनाशक फॅक्ट्रीमधून अत्यंत विषारी गॅस मिथाईल आयसोसायनेट (MIC) लिक झाला होता. त्याने जवळपास ५,४७६ जणांचे प्राण गेले तर पाच लाखांहून अधिक लोकांना आरोग्यविषयक समस्या आणि अपंगत्वाचा सामना आयुष्यभर करावा लागला. जगातील सर्वात भयंकर औद्योगिक दुर्घटनेपैकी एक मानली जाते.