नवी दिल्ली : देशात भाजपची सत्ता आल्यापासून भाजपला अच्छे दिन आले आहेत. सध्या भाजपच्या झोळीत देणग्या जात असून काँग्रेस-राष्ट्रवादीसह 10 पक्षांच्या पदरात मात्र देणग्यांची कमतरता दिसत आहे. याबाबत असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) या निवडणूक सुधारणांवर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेने ही माहिती दिली आहे. त्यानुसार देशात सत्तेत असणाऱ्या भाजपला लोकांनी भरभरून देणग्या दिल्या असून ती रक्कम 212 कोटींची आहे. तर देशाच्या राजकारणातील सगळ्यात जुन्या पक्षाला मात्र घरघर लागल्याचे दिसत आहे. काँग्रेस (Congress) -राष्ट्रवादीसह 10 पक्षांच्या पदरात मात्र फक्त 19 कोटीच पडल्याचे दिसत आहे. तर 2020-21 या आर्थिक वर्षात देशातील सात इलेक्टोरल ट्रस्टना कॉर्पोरेट आणि वैयक्तिक देणग्या स्वरूपात 258.49 कोटी रुपये मिळाले आहेत. या एकूण निधीपैकी ८२ टक्के निधी भाजपच्या (BJP) खात्यात गेला आहे. जो 212 कोटी आहे.
इलेक्टोरल ट्रस्ट या ही ना-नफा संस्था असून जी राजकीय पक्षांना कॉर्पोरेट आणि वैयक्तिक देणग्या उपलब्ध करून देते. तर देशातील निवडणूक निधीमध्ये पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने इलेक्टोरल ट्रस्टची संकल्पना आणण्यात आली होती. ADR ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, एकूण 23 निवडणूक ट्रस्टपैकी 16 ने 2020-21 या वर्षासाठी देणगी अहवाल सादर केला आहे. यापैकी 7 ट्रस्टने देणगी आणि त्यापैकी एकूण देणगीची माहिती दिली आहे. वार्षिक अहवाल सादर केलेल्या 16 निवडणूक ट्रस्टपैकी नऊ संस्थांनी त्यांना कोणतीही देणगी मिळाली नसल्याचे जाहीर केले आहे.
ADR ने म्हटले आहे की, 2020-21 या आर्थिक वर्षात देणग्या स्वीकारण्याची घोषणा केलेल्या सात निवडणूक ट्रस्टना कॉर्पोरेट आणि व्यक्तींकडून एकूण 258.4915 कोटी रुपये मिळाले आहेत. आणि विविध राजकीय पक्षांना 258. 4301 कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहेत. जे 99.98 टक्के आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या मते, 2020-21 या आर्थिक वर्षात 159 व्यक्तींनी इलेक्टोरल ट्रस्टला देणगी दिली आहे. तर 2020-21 मध्ये भाजपला 212.05 कोटी रुपये आणि जेडीयूला 27 कोटी रुपये देणग्या म्हणून मिळाले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आरजेडीसह इतर 10 पक्षांना 19.38 रुपये देणगी म्हणून मिळाले आहेत. या 10 पक्षांमध्ये काँग्रेस, NCP, AIADMK, DMK, RJD, AAP, LJP, CPM, CPI आणि लोकतांत्रिक जनता दल यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारने तयार केलेल्या नियमांनुसार, निवडणूक ट्रस्टने आर्थिक वर्षात मिळालेल्या एकूण योगदानाच्या 95 टक्के आणि मागील आर्थिक वर्षातील शिल्लक रक्कम 31 मार्चपूर्वी पात्र राजकीय पक्षांना वितरित करणे आवश्यक आहे. एडीआरने सांगितले की, प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टला दोन व्यक्तींनी 3.50 कोटी रुपयांचे योगदान दिले. 153 व्यक्तींनी स्मॉल डोनेशन इलेक्टोरल ट्रस्टला 3.202 कोटी रुपयांचे योगदान दिले. तर तीन व्यक्तींनी ईनझिगरटिग इलेक्टोरल ट्रस्टला एकूण 5 लाख रुपयांचे योगदान दिले आहे. तर एका स्वतंत्र व्यक्तीने 1,100 रुपयांचे योगदान दिले आहे.