मगरीच्या जबड्यात होता पतीचा पाय, पत्नीने नदीत उडी मारली, मगरीच्या तावडीतून पतीला असे वाचविले

| Updated on: Apr 13, 2023 | 12:43 PM

नदीवर बकऱ्या चरायला घेऊन दोघे पती-पत्नी गेले होते. पतीने अंघोळीसाठी नदीत उडी मारली इतक्यात मगरीने हल्ला केला आणि त्याचा पायच पकडला...

मगरीच्या जबड्यात होता पतीचा पाय, पत्नीने नदीत उडी मारली, मगरीच्या तावडीतून पतीला असे वाचविले
crocodile
Image Credit source: socialmedia
Follow us on

राजस्थान :  सावित्रीने तिच्या पती सत्यवान यांचे प्राण घेऊन जाणाऱ्या साक्षात यमाला आपल्या चातुर्याने वाचविल्याची कथा तर सर्वांनी वाचली असेल. आता आजच्या युगातील अनोख्या सावित्रीने संकटात पतीच्या प्राणरक्षणासाठी धावून येत तिने आपल्या पतीला एका भयंकर संकटातून अक्षरश: जीवनदान दिले आहे. या अनोख्या आधुनिक सावित्रीची कहानी अंगावर काटा आणणारी आहे. इतक्या घातकी धोकादायक जंगली प्राण्याशी लढण्याचे बळ तिच्या अंगी कसे आले याची चर्चा अख्ख्या पंचक्रोशीत सुरू आहे.

राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या दरम्यान वाहणाऱ्या चंबल नदीत मगरींची अगदी सुळसुळाट सुरू आहे. या मगरी नेहमी कोणत्या जनावरांवर किंवा माणसांवर हल्ले करीत आहेत. राजस्थानचा एक युवक नेहमीप्रमाणे आपल्या अंघोळीसाठी नदीवर गेला होता. तेवढ्या एका भयंकर मगरीने त्याच्यावर अचानक हल्ला केला. नशीबाने त्याचे पत्नी नदी घाटावर किनाऱ्यावर गुरांना राखत बसली होती. तिने आपल्या पतीचा आवाज ओळखला. मागचा पुढचा कोणताही विचार न करता थेट नदीच्या प्रवाहात उडी मारली. त्यानंतर तिने जे धाडस केले ते पाहून भल्याभल्यांचा थरकाप होईल…

मंगळवारी दुपारी घडलेली ही घटना आहे. करौली जिल्ह्याच्या मंडरायलच्या जवळ वाहणाऱ्या चंबळ नदीजवळील कैम कच्छ गावातील घाटात ही घटना घडली होती. या गावतील ३० वर्षीय बने सिंह बकऱ्यांना चरायला पत्नी विमल सोबत चंबळ नदीवर गेला होता. उष्णता असल्याने त्याने नदीत अंघोळ करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याची पत्नी बकरी चरायला निघून गेली.

मगरीने केला हल्ला, जबड्या पकडला पाय…

बने सिंह नदीत अंघोळ करीत असताना मगरींनी त्याच्यावर हल्ला केला. मगरीने त्याचा पाय जबड्यात पकडला आणि ती त्याला पाण्यात खेचून घेऊ लागली. तेव्हा या तरूणाने मदतीसाठी हाक मारायला सुरूवात केली. त्यामुळे त्याची पत्नी विमल प्रचंड घाबरून गेली. तिने पाहिले तर मगरीच्या जबड्यातच तिच्या पतीचा पाय अडकला होता. आणि पतीला मगर पाण्यात आत खेचू लागली होती. प्रसंग बाका होता. तिने पाहिले आजूबाजूला मदतीला कोणी नव्हते. तेव्हा तिने थेट पाण्यात उडी मारली. आणि पतीच्या जवळ पोहचली. पतीची हालत पाहून तिच्यात कुठून एवढे धैर्य आले माहीत नाही तिने आपल्या हातातील काठीने सरळ मगरीवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने मगरीने पाय सोडून दिला. आणि मगर पाण्यात निघून गेली.

रूग्णालयात उपचार सुरू, पत्नीच्या धाडसाची चर्चा

मगरीच्या हल्ल्यात पायाला जखमा झाल्याने बने सिंह यांना उपचारासाठी मंडरायल रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. परंतू जखमा जास्त असल्याने त्यांना करौली जिल्हा रुग्णालयात हलविले आहे. घटनेनंतर गावात मगरीची दहशत आणि विमल हीच्या धाडसाची चर्चा सुरू आहे. जर घटनेवेळी विमल उपस्थित नसती तर तिच्या पतीचा जीव वाचणे अवघड झाले असते असे म्हटले जात आहे. या परिसरातील मगरींचा उपद्रव वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.