बलरामपूर : उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये भीषण अपघाताची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली आहे. बलरामपूरच्या श्रीदत्तगंज पोलीस स्टेशन हद्दीतील गालिबपूर गावाजवळ कार आणि ट्रकमध्ये धडक झाली. या अपघातात पती-पत्नीसह चार मुलांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील लोक नैनितालहून देवरिया येथील त्यांच्या घरी जात होते. गाडी चालवत असताना चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की, अपघातात कारचा चक्काचूर झाला. कारमधील संपूर्ण कुटुंबच जागी ठार झाले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
पोलिसांना अपघातग्रस्त कारमधून एक आधार कार्ड मिळाले आहे. हे आधार कार्ड सोनू साहू नावाच्या व्यक्तीचे आहे. पोलिसांच्या आधार कार्डमध्ये नमूद पत्त्यानुसार कुटुंबीयांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे. कुटुंबीय घटनास्थळी आल्यानंतर मृतांची अधिक माहिती मिळू शकेल. अपघातग्रस्त कार स्विफ्ट डिझायर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
देवरिया येथील एक कुटुंब स्विफ्ट डिझाईर कारने नैनीताल फिरायला गेले होते. तेथून परतत असताना कारच्या चालकाला बलरामपूरमधील गालिबपूर गावाजवळ डुलकी आणि कार अनियंत्रित होऊन ट्रकला धडकली. या धडकेत एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. सर्व मृतदेह गाडीतून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
उत्तर प्रदेशातील बहराइच-सीतापूर रस्त्यावर शुक्रवारी अन्य एक अपघाताची घटना घडली. मोटारसायकल आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तिघेही एकाच दुचाकीवरून जात होते. ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने तिघांचाही मृत्यू झाला. दुचाकीस्वार घरी परतत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.