नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरात एका युवकाची हत्या (Brutal murder) करण्यात आली आहे. या तरुणाची 4 ते 5 जणांनी मिळून आतील रस्त्यावर हत्या केली. गजबजलेल्या बाजारात असलेल्या आतील भागात हे हत्याकांड घडवण्यात आले. मयंक पवार असे या 22 वर्षीय तरुणाचे नाव आहे. मयंकने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले होते. या घटनेचे सीसीटीव्ही (CCTV) समोर आले आहे. मारेकरी फरार असून पोलीसा त्यांचा शोध घेत आहेत. सीसीटीव्हीत गर्दी आणि गजबजलेल्या बाजारपेठेत 4 ते 5 जणांनी मयंकला घेरून धक्काबुक्की केली. यावेळी जमावापैकी एकानेही मयंकची मदत केली नाही. 11 ऑगस्ट रोजी मालवीय नगर भागातील बेगमपूर येथील किल्ल्यात 22 वर्षीय मयंक आपल्या मित्रासोबत बसला होता, त्यानंतर मयंक बद्दल 4-5 अज्ञात लोकांशी वाद (Dispute) झाला. मयंक आणि त्याच्या मित्रावर 4-5 मुलांनी दगडफेक केली.
मयंक आणि त्याचा मित्र जीव वाचवून किल्ल्यावरून निसटले. आरोपींनी मयंकचा किल्ल्यावरून पाठलाग केला. मालवीय नगर परिसरातील डीडीए मार्केटमध्ये तो पोहोचला आणि त्यानंतर मयंकला घेराव घालून गजबजलेल्या परिसरातच धारदार चाकूने हल्ला केला. आरोपी टोळके मयंकवर चाकूने सपासप वार करताना बाकीचे लोक मात्र केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसून आले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
मयंकच्या मित्राने रस्त्यावरील लोकांच्या मदतीने मयंकला जखमी अवस्थेत एम्समध्ये दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुटुंबीय पोलिसांवर गंभीर आरोप करत आहेत. मृतदेह हॉस्पिटलमध्ये आहे मात्र शवविच्छेदन होत नाही. तपास अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे, मात्र तो त्याच्या वैयक्तिक कामात आणि फक्त कागदोपत्री कामात व्यस्त आहे. याप्रकरणी कोणाला अटक झाली की नाही, याची माहितीही दिली जात नाही किंवा घटनेबाबत काहीही सांगितले जात नाही, असा आरोप मयंकच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मयंक पवार याचे काका प्रदीप पवार यांनी सांगितले, की त्यांचा पुतण्या काल दुपारी 2 नंतर घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर काय झाले ते कळले नाही. रात्री माहिती मिळाली आणि हॉस्पिटल गाठले तेव्हा मयंकच्या मित्राने दगडफेक झाल्याचे सांगितले. मात्र कोणाकोणादरम्यान काय झाले याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. एका गार्डला पोलिसांनी पकडल्याची माहिती आहे.
मयंकच्या नातेवाईक सोनल सिंह यांनी सांगितले, की काल रात्रीपासून आम्ही सर्वजण कालपासून चिंतेत आहोत, पोलीस काहीही सांगत नाहीत आणि कोणतीही कारवाई करत नाहीत. खुनाचे कारण काय? याबाबतही कोणी स्पष्ट केलेले नाही. दरम्यान, डीसीपी बेनिता मेरी जैकर यांनी आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून लवकरच त्यांना अटक करू, असे म्हटले आहे.