जबलपूर(मध्य प्रदेश) : बागेश्वर धाम (Bageshwar Dham) येथील धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ बागेश्वर बाबा यांच्या दरबारात आज धक्कादायक घटना घडली आहे. बागेश्वर बाबांच्या दरबारात एका दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या मुलीचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात धीरेंद्र शास्त्री यांचा सत्संग कार्यक्रम सुरु आहे. या दरबारात धीरेंद्र शास्त्री यांचं प्रवचन ऐकण्यासाठी शेकडो भाविकांनी गर्दी केली आहे. याच गर्दीत दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे.
जबलपूर येथील पनागर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, बागेश्वर बाबांच्या दरबारात एका लहान बाळाची तब्येत बिघडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. बाळाला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी या दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. डॉक्टरांचं हे निदान ऐकताच नातेवाईकांना धक्का बसला. काही क्षणापूर्वी हसत-खेळत असलेली मुलगी आता या जगात नाही, या कल्पनेनेच पालकांच्या अश्रूंचा बांध फुटला.
मुंबईतदेखील मीरारोड येथे काही दिवसांपूर्वीच बागेश्वर बाबांचा कार्यक्रम पार पडला. येथेही शेकडोंच्या संख्येने भाविक दाखल झाले होते. या वेळी मंडपातील अनेक भाविकांचे पैसे, पाकिटं चोरीला गेल्याचं उघडकीस आलं होतं.
हिंदुत्वाचा प्रसार कऱण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचं बागेश्वर बाबा यांनी आजवर अनेक कार्यक्रमांतून सांगितलंय .मात्र नुकतीच त्यांनी केलेली एक घोषणा चर्चेत आहे. येत्या रामनवमी निमित्त धीरेंद्र शास्त्रींनी ही घोषणा केली आहे. मुस्लिम समाजासाठीही लवकर रामकथेचं आयोजन केलं जाईल, असं धीरेंद्र सास्त्री म्हणाले. जबलपूर जिल्ह्यातील पनागर येथे सुरु असलेल्या कार्यक्रमातच धीरेंद्र शास्त्रींनी हे वक्तव्य केलंय. कटनी येथील तनवीर खान यांनी बागेश्वर बाबांना तीन दिवसांची रामकथा कार्यक्रम करावा, अशी विनंती केली आहे. ती धीरेंद्र शास्त्री यांनी स्वीकारली आहे. देशाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच होईल. सगळे लोक एकत्र येतील. या कथेतूनच एकता आणि शांतता साकार होऊ शकते. संपूर्ण विश्व याच्याशीच निगडीत आहे, असं वक्तव्य बागेश्वर बाबांनी केलंय.
आपल्याकडील दैवी शक्तींमध्ये अनेक चमत्कार घडवण्याची ताकद आहे, असे दावे बागेश्वर बाबा आपल्या कार्यक्रमांतून करत असतात. महाराष्ट्रातील नागपूर येथे काही महिन्यांपूर्वी बागेश्वर बाबांचा सत्संग आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या दाव्यांना आव्हान दिलं होतं. श्याम मानव यांनी जादूटोणा विरोधी कायद्यानुसार, बागेश्वर बाबांवर कारवाई करण्याची तक्रार दाखल केली होती. मात्र बागेश्वर बाबांनी यावर कडाडून टीका केली होती.