नवी दिल्ली : एअर इंडियाच्या फ्लाईट्स (Air India) सध्या चर्चेचा विषय बनल्या असून एका प्रवाशाने विमानात पुन्हा गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. या प्रवाशाने विमानप्रवासात (flight) लाजिरवाणे कृत्य केले. मुंबईहून दिल्लीला येणाऱ्या या विमानात प्रवाशाने विमानात सीटवरच लघवी केली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर तो आपल्या जागेवर बसल्या बसल्याच थुंकलाही.
हे सर्व पाहून विमानातील क्रू मेंबर्सनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांच्याशी वादही घातला. हे भांडण बराच वेळ सुरू होते. 24 जून रोजी AIC866 ही फ्लाइट मुंबईहून दिल्लीला येत असताना त्यामध्ये ही लाजिरवाणी घटना घडल्याचे समोर आले आहे.
एअर इंडियाच्या विमानांमध्ये सतत काही ना काही विचित्र घटना घडत असतातच. त्यातच आता या नव्या वादाची भर पडली आहे. राम सिंह असे या प्रवाशाचे नाव असून तो 24 जून रोजी मुंबईहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमधून प्रवास करत होता. सीटवर बसलेला असतानाच त्याने प्रथम लघवी केली आणि शौचही केले. मात्र तो तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्याचे गैरवर्तन सुरूच ठेवले आणि तो त्याच जागेवर थुंकलाही.
विमानातील क्रू मेंबर्सनी या घटनेबद्दल त्वरित पायलटला आणि एअर इंडियाच्या सिक्युरिटी टीमला कळवले. तसेच ते त्या प्रवाशाला समजावण्याचाही प्रयत्न करत होते. मात्र त्याने कोणाचेही न ऐकता बाचाबाची केली. त्यानंतर क्रू मेंबर्स आणि प्रवासी यांच्यादरम्यान बराच वेळ वाद सुरूच होता. यामुळे विमानातील इतर प्रवाशांनाही बराच त्रास सहन करावा लागला.
अखेर हे विमान दिल्ली विमानतळावर लँड झाल्यावर त्या प्रवाशाला आयजीआय (इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एयरपोर्ट ) एअरपोर्ट वरील सुरक्षआ अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत त्या प्रवाशाला अटक केली आहे.
FIR मध्ये काय म्हटले आहे ?
24 जून 2023 रोजी मुंबईहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या AIC 866 फ्लाइटमध्ये प्रवासी राम सिंह सीट क्रमांक 17F वर बसले होते. त्यांनी विमानात सीटवरच शौच आणि लघवी केली. तसेच ते त्या जागेवर थुंकलेही. केबिन क्रूने या घटनेवर आक्षेप घेत त्यांना तोंडी इशारा दिला. त्यांना घटनास्थळावरून तत्काळ हटवण्यात आले.
त्यानंतर केबिन क्रूने पायलटला या घटनेची माहिती दिली. एअर इंडियाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनाही याबाबत कळवण्यात आले. विमान लँड होताच या प्रवाशाला सुरक्षा अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले. याप्रकरणी विमानातील अन्य प्रवाशांनी तीव्र नाराजी दर्शवली. विमानाच्या कॅप्टनच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
यापूर्वीही घडल्या होत्या अशा घटना
याआधी गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये बिझनेस क्लासमध्ये बसलेल्या महिला प्रवाशावर एका मद्यधुंद प्र वाशाने लघवी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ७ जानेवारी रोजी बंगळुरू येथून अटक केली होती.