नवी दिल्ली | 10 मार्च 2024 : सध्या युरोप मधील अनेक देशांमध्ये पॅरोट फिव्हर (Parrot Fever) नावाच्या नवीन रोगाने कहर केलाय. या तापामुळे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) आपल्या अहवालात मृत लोकांमध्ये 4 डेन्मार्कचे तर एक व्यक्ती नेदरलँडचा असल्याचे म्हटले आहे. या पाच जणांव्यतिरिक्त ऑस्ट्रिया, जर्मनी आणि स्वीडनमधील डझनभर लोकांना पोपट तापामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. ही बाब चिंताजनक आहे. हा आजार अन्य देशांमध्येही फैलावू शकतो असेही या अहवालात म्हटले आहे.
पोपट ताप हा रोग संक्रमित पक्ष्यांशी संपर्क साधून, त्यांच्या पिसांना स्पर्श करून किंवा त्यांच्या वाळलेल्या विष्ठेतील कणांद्वारे मानवांमध्ये पसरू शकतो. अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे असे आवाहन who ने केले आहे. पोपट तापाची लक्षणे सामान्यत: सौम्य दिसतात. या रोगाचे संक्रमित झाल्यानंतर सुमारे 14 ते 15 दिवसांनी ती दिसू लागतात. या काळात रुग्णाची परिस्थिती अधिक गंभीर होते. त्यामुळे अधिक गंभीर आणि जीवघेणी स्थिती होण्यापूर्वी तपासणी करणे महत्वाचे आहे असेही who ने म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार पोपट तापाचे औपचारिक नाव सिटाकोसिस असे आहे. क्लॅमिडीया या जीवाणूंमुळे होणारा हा संसर्गजनी रोग आहे. हा जीवाणू बहुतेक पक्ष्यांना, विशेषत: पोपटांना संक्रमित करत आहे. या जीवाणूबाधित पोपटांशी संपर्क आल्यास हा रोग व्यक्तीमध्ये पसरतो म्हणून त्याला पोपट ताप असे नाव देण्यात आले आहे. पोपटांव्यतिरिक्त, हा रोग विविध जंगली आणि पाळीव पक्षी आणि कोंबड्यांद्वारे देखील पसरतो. विशेष म्हणजे बाधित पक्ष्यावर या रोगाचा कोणताही परिणाम दिसून येत नाही.
हा रोग संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात येऊन, त्यांच्या पिसांना स्पर्श करून किंवा त्यांच्या वाळलेल्या विष्ठेतील कणांच्या संपर्कात येऊन मानवांमध्ये पसरतो. अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे असे who ने आपल्या अहवालात म्हटले आहे.
एखाद्या व्यक्तीमध्ये हा रोग पसरल्यास त्या व्यक्तीला खूप ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखणे, पेटके येणे, कोरडा खोकला, अति सर्दी यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. डब्ल्यूएचओने अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे. कोणतही ताप असेल तर त्याला सामान्य ताप समजू नये. याशिवाय गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णाला निमोनियाचाही त्रास होऊ शकतो. सुरवातीला पोपट तापाची लक्षणे सामान्यत: सौम्य असतात. संसर्ग झाल्यानंतर सुमारे 14 ते 15 दिवसांनी ती दिउसून येतात. त्यामुळे अधिक गंभीर आणि जीवघेणी स्थिती होण्यापूर्वी तपासणी करणे महत्वाचे आहे असे who ने अहवालात म्हटले आहे.