मुंबई| 17 जानेवारी 2024 : मुंबई ते बंगळुरु जाणाऱ्या स्पाईसजेट विमान कंपनीच्या विमानातील प्रवाशावर मोठे गंभीर संकट ओढवले आहे. या प्रवाशाच्या टॉयलेटचा दरवाजा लॉक झाल्याने त्याला तासभर आतच बसून प्रवास करावा लागल्याचा विचित्र प्रकार मंगळवारी घडला. या प्रकरणानंतर स्पाईसजेट कंपनीने प्रवाशाची माफी मागितली असून विमान तिकीटाचे संपूर्ण पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री दोन वाजता विमानाने उड्डाण घेतल्यानंतर या प्रवाशाला टॉयलेटला जायचे होते. त्याने टॉयलेटला गेल्यानंतर दरवाजा आतून बंद केला. परंतू बाहेर येताना दरवाजा उघडता न आल्याने तो आतच अडकून राहीला. त्यामुळे या प्रवाशाला संपूर्ण प्रवास टॉयलेटमध्ये बसूनच करावा लागल्याने त्यांची अवस्था वाईट झाली.
स्पाईस जेट कंपनीच्या SG-268 या विमानाने मुंबईहून बंगळुरुला मंगळवारी रात्री दोन वाजता उड्डाण घेतले. त्यानंतर एक प्रवासी टॉयलेटला गेला. परंतू त्याचा दरवाजा लॉक झाल्याने तो आतच अडकला. टॉयलेटमध्ये अडकलेल्या प्रवाशाच्या मदतीला क्रु मेंबर धावले. क्रु मेंबर आणि अन्य प्रवाशांनी टॉयलेटचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. त्यानंतर प्रवाशाचे अवसान गळाले. परंतू त्याचे धैर्य कायम ठेवण्यासाठी क्रु मेंबरने कागदावर चिठ्ठी लिहून टॉयलेटच्या आत टाकली. सर आम्ही दरवाजा उघडण्याचा संपूर्ण प्रयत्न करतोय. परंतू दरवाजा काही उघडत नाहीए…तु्म्ही घाबरु नका. काही वेळातच विमान लॅंड होईल. त्यानंतर आम्ही तुम्हाला बाहेर काढु अशी चिट्टी प्रवाशासाठी लिहून आता दरवाज्यातून टॉयलेटमध्ये सारण्यात आली. या चिट्टीत कमोडचे झाकण बंद करुन त्यावर खूर्ची सारखे बसून रहाण्याची विनंती प्रवाशाला करण्यात आली. इंजिनियरच्या मदतीने दरवाजा उघडेपर्यंत स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन या प्रवाशाला करण्यात आले.
फ्लाईट जेव्हा सकाळी 3.42 वाजता बंगळुरुच्या केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्टवर लॅंड झाले. तेव्हा विमान कंपनीच्या इंजिनियरनी धाव घेतली. आणि टॉयलेटचा दरवाजा तोडून या प्रवाशाची सुटका केली. मुंबई ते बंगळुरु असा 100 मिनिटांचा प्रवास या प्रवाशाला टॉयलेट सीटवर बसूनच करावा लागला. या प्रकरणात स्पाईसजेट कंपनीने प्रवाशा रिफंड देण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जाते.