भारत हा एक अतिप्राचीन देश आहे. भारतामध्ये अनेक संस्कृतींचा विकास झाला आणि काळाच्या ओघात या संस्कृती नष्ट देखील झाल्या. मात्र नष्ट होत असताना त्यांनी काही प्रथा परंपरा आणि इतिहासाच्या रुपानं आपल्या पाऊल खुणा ठेवल्या. ज्यामुळे आपल्याला त्या संस्कृतीबद्दल माहिती होण्यास मदत होते. तो इतिहास समजून घेता येतो. आजही देशात असे अनेक गावं आहेत, ज्या गावात पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथा परंपरांचं पालन केलं जातं. प्रसंगी या प्रथांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला दंड किंवा शिक्षा देखील होते. भारत हा खेड्यांचा देश आहे. भारतात असे अनेक खेडे आहेत, जेथील लोक आजही आपल्या प्रथा परंपराचं पालन मोठ्या अस्थेनं करतात, त्यामागे अनेक कारणं सांगितली जातात. आज आपण अशाच एका गावाबद्दल माहिती घेणार आहोत.
जे गाव हे हिमाचल प्रदेशमधल्या कुल्लू जिल्ह्यात आहे. ज्याचं नाव मलाना असं आहे. मलाना गाव आपल्या अनोख्या प्रथांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. जेव्हा संपूर्ण जगात कोरोनाचा उद्रेक झाला होता, तेव्हा त्याच्यापासून बचावासाठी म्हणून सोशल डिस्टेंसिंगचा पर्याय समोर आला. मात्र या गावात कोरोनापासून नाही तर गेल्या शेकडो वर्षांपासून सोशल डिस्टेंसिंगची प्रथा पाळली जाते. बाहेरून कोणताही व्यक्ती गावात आला तर त्या व्यक्तीला इथे माणसांनाच नाही तर वस्तुंना देखील स्पर्श करता येत नाही. या मागे शुद्धतेची कल्पना आहे, त्यामुळे इथे येणारा कोणताही व्यक्ती इथल्या लोकांना किंवा तेथील लोकांना स्पर्श करू शकत नाही. जर स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याकडून मोठा दंड आकारला जातो. पहिल्यांदा दंड, मात्र दुसऱ्यावेळी पुन्हा तीच चूक केली तर मात्र तेथील पंच जी शिक्षा सुनावतील ती त्याला मान्य करावी लागते.
एवढंच नाही तर या गावाने स्वत:चे कायदे देखील स्वत: तयार केले आहेत. भारतात असून देखील भारताचे कायदे येथील स्थानिक मानत नाहीत. त्यांची स्वत:ची अशी न्याय व्यवस्था आहे. ज्यामध्ये गावातील आकरा जणांची सदस्य म्हणून निवड करण्यात येते. हेच आकरा जण येथील कायदे देखील ठरवतात. हे गाव आणखी एका कारणासाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे हशीस अर्थात चरसच्या उत्पादनासाठी.