मुंबई : गेल्या अनेक वर्षांची रामभक्तांची प्रतीक्षा आता अंतिम टप्प्यात आली आहे. अवघ्या काही तासात मंदिरात विराजमान असलेल्या प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. 22 जानेवारीला दुपारी 12 वाजल्यानंतर हा विधी पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील दिग्गज हजेरी लावणार आहे. यासाठी देशभरातील विविध लोकांना आमंत्रम दिलं गेलं आहे. यात सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट कोहलीसह माजी क्रिकेटपटूही सहभागी होणार आहेत. यात आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार हरभजन सिंग याच्या नावाचाही समावेश आहे. सचिन, कोहली, धोनी यांनी या कार्यक्रमात सहभागी होणार की नाही? याबाबत कळवलेलं नाही. पण माजी क्रिकेटपटू आणि आप खासदार हरभजन सिंगने 22 जानेवारीला अयोध्येत जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
‘आमचं नशिब इतकं चांगलं आहे की अयोध्येत प्रभू रामचंद्रांचं मंदिर बनत आहे. आम्हाला तिथे जाऊन प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. प्रभू रामांवर माझी आस्था आहे आणि तेथे कोण जाणार आणि कोण नाही जाणार यामुळे काही फरक पडत नाही.’, असं थेट विधान हरभजन सिंग याने एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना केलं आहे. हरभजन सिंग याच्या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कार्यक्रमात जाणार नसल्याचं जाहीर केलं आहे.
हरभजन सिंग याने सांगितलं की, ‘मला काहीच फरक पडत नाही की कोणते राजकीय पक्ष त्या कार्यक्रमाला जाणार आहे. मी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला नक्की जाणार आहे. जर कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी जाऊ नये.’ राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अनेक दिग्गजांची हजेरी असणार आहे. सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, विराट कोहली, एमएस धोनी, कपिल देव, आर अश्विन, सुनील गावस्कर आणि रोहित शर्मा सारखे दिग्गज खेळाडू या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या सर्वांना श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून निमंत्रण मिळालं आहे.