Explainer | अब की बार 400 पार, काय आहे भाजपचे गणित आणि लोकसभा निवडणुकीतील आव्हाने?

| Updated on: Jan 15, 2024 | 10:22 PM

लोकसभा निवडणुकीची भाजपसह सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यावेळी भाजपने 400 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या वेळी भाजपने 303 जागा जिंकल्या होत्या. 2014 पेक्षा त्या जास्त होत्या. यावेळी भाजपच्या 400 जागांमागील गणित कसे असेल ते जाणून घेऊ.

Explainer | अब की बार 400 पार, काय आहे भाजपचे गणित आणि लोकसभा निवडणुकीतील आव्हाने?
PM NARENDRA MODI
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली | 15 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने उरले आहेत. आगामी लोकसभेसाठी भाजपने अब की बार 400 पार असा नारा दिला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 303 जागा जिंकल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची त्यावेळी लाट होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षाही जास्त जागा आणि मतांची टक्केवारी भाजपला मिळाली. 2014 मध्ये मतांची टक्केवारी 31 होती 2019 मध्ये ती वाढून 37 टक्के इतकी झाली. त्यामुळे आता भाजपने 400 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले असले तरी मतांची टक्केवारीही वाढवावी लागणार आहे. यासाठी भाजपला यापूर्वी न जिंकलेल्या जागाही जिंकाव्या लागणार आहेत हे उघड आहे.

ज्या राज्यांमध्ये भाजप यापूर्वी जिंकला आहे. त्या राज्यांतील जागा कायम ठेवण्यासोबतच नवीन जागा जिंकून आणणे हे भाजपसमोर आव्हान असेल. त्यामुळे आपले ग्राउंड शोधून त्याची मुळे त्यांना अधिक खोलवर रुजवाची लागणार आहेत.

आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या 25 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपला येथे एकही जागा मिळाली नव्हती. तामिळनाडूतील 39 जागांपैकी भाजपच्या खात्यात काहीही आले नाही. केरळमधील 20 जागांपैकी भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. या तीन राज्यांच्या मिळून एकूण 84 जागा आहेत. भाजपला 400 जागांचे लक्ष्य गाठायचे असेल तर त्यांनाया तीनही राज्यात फक्त आपले खाते खोलावे लागणार नाही तर चांगली कामगिरीही करून दाखवावी लागणार आहे.

महाराष्ट्रामध्ये ४८ जागांपैकी भाजपला २३ जागा मिळाल्या होत्या. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजपचे मित्र पक्षही बदलले आहेत. त्यामुळे आपले लक्ष्य गाठण्यासाठी भाजपला महाराष्ट्रातही जास्त जागा जिंकाव्या लागणार आहेत.

पश्चिम बंगालमध्ये 42 जागा आहेत. त्यापैकी भाजपला 18 जागा मिळाल्या होत्या. ही भाजपची आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी सुमार ठरली. पश्चिम बंगालमध्ये TMC सरकार जे I.N.D.I.A. चा घटकपक्ष आहे. विरोधकांमध्ये योग्य जागावाटप झाल्यास भाजपला येथे जागा वाढविण्यात अडचण येऊ शकते. पण, लक्ष्य गाठण्यासाठी भाजपला प्रयत्न करावे लागणार आहेत.

कर्नाटकात भाजपने 28 पैकी 25 जागा जिंकल्या होत्या. पण, आता येथे कॉंग्रेस सरकार आहे. अशा स्थितीत येथे भाजपला खूप मोठे आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण 25 जागा आहेत. त्यापैकी भाजपकडे 11 जागा आहेत. परंतु, प्रादेशिक पक्षांशी स्पर्धा करताना भाजपला इथल्या जागा वाढवता येतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पंजाबमध्ये लोकसभेच्या 13 जागा आहेत. इथेही भाजपला जास्त जागा जिंकाव्या लागतील. पण, यावेळी स्पर्धा फक्त आपसोबत नाही तर शिरोमणी अकाली दलाशीही असणार आहे. बिहारमध्येही नितीशकुमार यांच्याशी असलेली युती तुटली आहे त्यामुळे इथेही भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

विक्रमी विजयाची अपेक्षा कशी करावी?

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. त्यामुळे भाजपचे मनोबल उंचावले आहे. भाजपने जाहीरनाम्यातील अनेक आश्वासने पूर्ण केली. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करणे, अयोध्येतील भव्य राम मंदिराचा अभिषेकही याच महिन्यात होणार आहे. भाजपने त्याचे राष्ट्रीय उत्सवात रूपांतर केले. याचा फयदा मात्र निवडणुकीत होणार का हे पाहणे महत्वाचे आहे.

लोकसभा निवडणुकीपर्यंत हेच वातावरण कायम ठेवण्यासाठी भाजप तयारी करत आहे. राममंदिरावरून लोकसभेच्या जवळपास सर्व जागांवर दीड लाख मतांची वाढ भाजपला अपेक्षित आहे. त्याशिवाय विकासाच्या नावाखालीही जागा वाढण्याची त्यांना अपेक्षा आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या अनेक योजनांचे लाभार्थी ही मोठी व्होट बँक बनली आहे.

भाजपने आगामी निवडणुकीसाठी प्रत्येक जिल्ह्यात कॉल सेंटर सुरू केले आहे. प्रत्येक लाभार्थ्यांशी संपर्क साधला जात आहे. विकास भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून भाजप तरुणांना टार्गेट करत आहे. त्यांना विकसित भारताचे ब्रँड अॅम्बेसेडर होण्यासाठी आमंत्रित करत आहे. तर दुसरीकडे अनेक खासदारांची तिकिटे बदलण्याची तयारी केली आहे. कमकुवत जागांवर नवीन पण सक्षम उमेदवार देण्याची तयारी पक्ष करत आहे. अशा जवळपास 160 जागा आहेत. याच बळावर भाजपने अब की बार, 400 पार अशी घोषणा केल्याचे सांगण्यात येते.