अदानी समुहाची मोठी घोषणा, ओदिशा ट्रेन अपघातात मृत्यू झालेल्यांच्या मुलांसाठी अशी करणार मदत

| Updated on: Jun 04, 2023 | 7:22 PM

ओदिशा रेल्वे अपघातानंतर देशभरात निराशेचे वातावरण असतानाच अदानी उद्योग समुहाने मोठी घोषणा केली आहे. अपघातातील बळीसंदर्भात महत्वाची जबाबदारी घेण्याची तयारी अदानी समुहाने दाखविली आहे.

अदानी समुहाची मोठी घोषणा, ओदिशा ट्रेन अपघातात मृत्यू झालेल्यांच्या मुलांसाठी अशी करणार मदत
gautam_adani
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली : ओदिशाच्या बालासोर ( Odisha Train Accident )  मध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातातील मृत्यूंच्या तांडवाने अख्खा देश सुन्न झाला आहे. या अपघातात 275 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजार जण जखमी झाले आहेत. या अपघाताने देशभरातच नव्हे तर जगभरातून दु:ख जाहीर केले जात आहेत. अशा दुखद वातावरणात अदानी उद्योग ( Adani group ) समुहाने मोठी घोषणा केली आहे. उद्योगपती गौतम अदानी यांनी ज्या निष्पाप जीवांनी आपल्या पालकांना या अपघातात गमावले आहे त्यांच्या महत्वाची जबाबदारी अदानी समुह उचललणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

अदानी यांनी काय म्हटले ?

देशभरात रेल्वे अपघातातील बळींच्या आकड्याने निराशेचे वातावरण आहे. अशा वातावरणात उद्योगपती गौतम अदानी यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करीत ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की ओदिशा रेल्वे अपघाताने आपण व्यथित झालो आहोत. आम्ही असा निर्णय घेतला आहे की या अपघातात ज्यांनी आपल्या पालकांना गमावले आहे त्यांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी अदानी समुह उचलेल. पीडीत व्यक्तींना आधार आणि मुलांना चांगले भविष्य मिळावे ही आम्हा सर्वांची संयुक्त जबाबदारी असल्याचे त्यांनी या ट्वीट मध्ये म्हटले आहे.

रेल्वेमंत्री काय म्हणाले 

ओदिशा रेल्वे अपघाताच्या प्राथमिक चौकशीत अपघाताला जबाबदार असलेल्या कारणांचा उलगडा झाला आहे. या अपघाताचा तपास रेल्वे सुरक्षा आयुक्त करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल घटनास्थळी भेट दिली आहे. मदतकार्य पूर्ण झाले आहे. घटनास्थळावरुन डब्बे उचलण्यात आले आहेत. बुधवारी ( 7 जून ) सकाळ पर्यंत रेल्वे मार्ग सुरु करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. रेल्वे सुरक्षा आयुक्तांचा अहवालानंतर अपघाताला जबाबदार घटकाचा उलगडा विस्तृतपणे होईल. आतापर्यंत झालेल्या प्राथमिक चौकशीत सिग्नल यंत्रणेत गफलत झाल्याचे उघडकीस आले असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले आहे.