कधीकाळी मुंबईच्या लोकलमध्ये वस्तू विकायचे अदानी, शरद पवार यांचा किस्सा चर्चेत

| Updated on: Apr 09, 2023 | 6:32 PM

हिरे व्यापाऱ्यात चांगली कमाई होत असतानाही अदानी यांना त्यात रस नव्हता. त्यांना त्यापेक्षाही मोठी झेप घ्यायची होती.

कधीकाळी मुंबईच्या लोकलमध्ये वस्तू विकायचे अदानी, शरद पवार यांचा किस्सा चर्चेत
Gautam-Adani-And-pawar
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक उद्योगपती गौतम अदानी यांची बाजू सावरल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. परंतू पवार यांनी साल 2015 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मकथनपर पुस्तकात अदानी यांचे कौतूक करताना ते अत्यंत मेहनती आणि तळागाळातून आलेले धाडसी उद्योजक आहेत असे म्हटले आहे. त्यांची सुरूवात लोकलमध्ये वस्तू विकण्यापासून झाली. अदानी यांना आपण थर्मल पॉवर क्षेत्रात येण्याचा आग्रह केल्याचेही पवार यांनी या पुस्तकात म्हटले आहे.

राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा शरद पवार यांनी उद्योजक अदानी यांनी जिद्दीने लोकलचा साधा सेल्समन ते बडा उद्योजक हा प्रवास मेहनतीने केल्याचे म्हटले आहे. लोकलमधील वस्तू विकताना त्यांनी छोट्या – छोट्या उद्योगात आपले नशीब आजमावले. त्यानंतर ते हिरे व्यापारात उतरले. हिरे व्यापाऱ्यात चांगली कमाई होत असतानाही अदानी यांना त्यात रस नव्हता. त्यांना त्यापेक्षाही मोठी झेप घ्यायची होती. गुजरातचे मुख्यमंत्री चिमनभाई पटेल यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. अदानी यांनी मुंद्रा मधल्या एका बंदराचा विकास करण्याचा प्रस्ताव त्याच्या समोर ठेवला होता. परंतू चिमनभाई पटेल यांनी हे बंदर पाकिस्तान सीमेच्या शेजारी असल्याचा इशारा अदानी यांना देत सावध केले होते. परंतू तरीही हे आव्हान अदानी यांनी लीलया पेलले.

चिमनभाई यांच्या मैत्रीचा दोन्ही राज्यांना फायदा

शरद पवार यांनी आपल्या आत्मकथेत लिहिले आहे की अदानी यांनी नंतर कोळसा खाण उद्योगात प्रवेश केला. आपल्या सल्ल्यानंतर ते थर्मल पॉवर क्षेत्रात उतरले. त्यावेळी आपण केंद्रीय कृषीमंत्री होतो. प्रफुल्ल पटेल यांच्या वडीलांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात अदानी यांना आपण हा सल्ला दिल्याचे शरद पवार यांनी लिहीले आहे. त्यानंतरच अदानी यांनी भंडारा येथे थर्मल पॉवर प्लांट सुरू केला.

अनेक उद्योजकांशी स्नेह

महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण अनेक उद्योगपतींना आपल्या राजकीय कारकीर्दीत सल्ले दिले. अनेक उद्योगपतींशी चांगले संबंध ठेवले. उद्योगजक कोणत्याही दिवशी दुपारी दोन ते सायंकाळी चार वाजेपर्यंत आपल्याला भेटू शकत होते. पवार यांनी गुजरातचे मुख्यमंत्री चिमनभाई पटेल यांच्याशी असलेल्या संबंधाचाही उल्लेख केला आहे. त्यांनी अनेक मोठ्या योजना महाराष्ट्रात पाठवल्या. त्याबदल्यात आपणही काही योजना गुजरातला पाठवल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे दोन्ही राज्यांना फायदा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पवारांनी घेतली अदानींची बाजू

कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी उद्योगपती गौतम अदानी यांची जॉईंट पार्लमेंटरी कमिटीद्वारे ( जेपीसी ) चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे, तर शरद पवार यांनी अदानी यांची सुप्रीम कोर्टाच्या समितीद्वारे होणारी चौकशी पुरेशी असल्याचे म्हणत सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे. हिंडनबर्ग अहवालावरून गौतम अदानी यांना नाहक टार्गेट केले जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. तर कॉंग्रेस मात्र जेपीसी चौकशीवर टाम आहे.