नवी दिल्ली : देशात कोरोना पाठोपाठ ओमायक्रोन (Omicron) विषाणूने मागील काही महिने दहशत निर्माण केली आहे. रोज नवीन रुग्णसंख्या नोंद होत आहे. ओमायक्रोनचा हा वाढता संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने मोठी दिलासादायक बातमी दिली आहे. सध्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) ही लस उत्पादक कंपनी नोव्हावॅक्ससोबत ओमायक्रोन व्हेरिएंट विरोधातील लस (Vaccine) तयार करत आहे. कंपनीचे प्रमुख, सीईओ अदार पूनावाला यांनी सोमवारी मीडिया हाऊसला दिलेल्या विशेष मुलाखतीत ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव रोखण्यात सीरमने भरीव योगदान दिले होते. त्यानंतर आता ओमायक्रोनविरोधी लढ्यातही या कंपनीकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. त्यामुळे ओमायक्रोनच्या चिंतेच्या वातावरणात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भारतात ओमायक्रोन प्रतिबंधक लस ही एक विशेष लस तयार केली जात आहे. ही लस चालू वर्षाच्या अखेरीस येण्याची अपेक्षा आहे. ही लस विशेषतः ओमायक्रोनच्या BA5 उपआवृत्तीसाठी आहे, यासाठी ब्रिटनने अद्ययावत मॉडर्ना लसीला मंजुरी दिली आहे. ही लस ओमायक्रोन व्हेरिएंटसाठी तसेच विषाणूच्या मूळ स्वरूपासाठी प्रभावी आहे, असा दावा अदार पूनावाला यांनी ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. मला वाटते की, ही लस बूस्टर डोस म्हणून खूप महत्त्वाची ठरेल, असेही ते म्हणाले. ओमायक्रोन हा सौम्य स्वरुपाचा व्हेरिएंट नाही. ज्या व्यक्तीला या व्हेरिएंटची लागण होते, त्या व्यक्तीला तीव्र स्वरूपाचा ताप येतो, असेही पूनावाला यांनी म्हटले आहे. पुनावाला यांनी दिलेल्या या माहितीमुळे नव्या वर्षात ओमायक्रोन प्रतिबंधक लस बाजारात येऊन हा व्हेरिएंट आटोक्यात येण्यास मोठी मदत होईल, असा आशावाद आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
ब्रिटनने कोरोना विषाणूविरूद्ध अद्ययावत मॉडर्ना लस मंजूर केली आहे. ही लस कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरिएंटसोबतच मूळ स्वरूपावरही प्रभावी आहे, असे ब्रिटनच्या औषध नियामकाने सोमवारी जाहीर केले आहे. याचदरम्यान अदार पूनावाला यांनी ओमायक्रोन प्रतिबंधक लस तयार करण्यास सीरम इन्स्टिट्यूटने सक्रीय पुढाकार घेतल्याचे स्पष्ट केले आहे. मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी (MHRA) ने एका निवेदनात म्हटले आहे की, सुरक्षितता, गुणवत्ता आणि परिणामकारकतेसाठी नियामक मानकांची पूर्तता केल्यानंतर ब्रिटनने प्रौढांना बूस्टर डोससाठी आधुनिक लसीला मंजुरी दिली आहे. (Adar Poonawala informed that serum institute is preparing a new vaccine on Omicron Variant)