मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीआधी भाजपचे विद्यमान खासदार मोठे निर्णय घेताना दिसत आहे. टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यानेही राजकारणामध्ये आपण थांबत असल्याचा निर्णय घेतला आहे. गौतम गंभीर आता राजकारणात दिसणार नाही, त्याच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत असलेली पाहायला मिळत आहे. गंभीरचा निर्णय झाल्यावर भाजपच्या आणखी एका खासदाराने अशाच प्रकारचा निर्णय घेतला आहे. कोण आहे ते खासदार? त्यांनी असा निर्णय का घेण्यामागचं कारणही सांगितलं आहे.
भाजप खासदार जयंत सिन्हा यांनी आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये न लढण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. हजारीबागचे खासदार असलेल्या जयंत सिन्हा यांनी फक्त खासदारकीसाठी निवडणुक लढवणार नसल्याचं सांगितलं आहे. परंतु ते भाजपसोबत काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. गंभीरपाठोपाठ सिन्हा यांनीसुद्धा अशा प्रकारचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
मी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना माझ्या थेट निवडणुकीच्या कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून मी भारत आणि जगभरातील जागतिक हवामान बदलांना तोंड देण्यासाठी माझे प्रयत्न केंद्रित करू शकेल. आर्थिक आणि प्रशासनाच्या मुद्द्यांवर मी पक्षासोबत काम करत राहील. गेल्या दहा वर्षात मला भारत आणि हजारीबागच्या जनतेची सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे. याशिवाय मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप नेतृत्वाने अनेक संधी दिल्या आहेत. त्या सर्वांचे माझे मनःपूर्वक आभार. जय हिंद, असं सिन्हा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, भाजप आगमी लोकसभा निवडणूकीच्या आधी उमेवारांची नावे जाहीर करण्याआधी खासदारांनी मोठे निर्णय घेतले आहेत. भाजप विद्यमान खासदारांचे तिकीट कापणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली होती. मात्र त्याआधीच एक-एक खासदार स्वत: निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीरपणे सांगत आहेत.