PM Modi Big Announcement : अयोध्येतून परतताच PM मोदींची पहिली मोठी घोषणा, सूर्यवंशी श्री रामाच्या नावाने सुरु करणार ही योजना

| Updated on: Jan 22, 2024 | 9:00 PM

पीएम मोदी यांनी अयोध्येहून परत येताच नवी दिल्लीत एक विशेष सभा घेतली, त्यानंतर त्यांनी गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी ही मोठी घोषणा केली. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी होईल. तसेच, ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल.

PM Modi Big Announcement : अयोध्येतून परतताच PM मोदींची पहिली मोठी घोषणा, सूर्यवंशी श्री रामाच्या नावाने सुरु करणार ही योजना
PM NARENDRA MODI
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली | 22 जानेवारी 2024 : अयोध्येतील रामलला यांच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत परतले. नवी दिल्लीत येताच त्यांनी एका नव्या योजनेची मोठी घोषणा केली. प्रभू राम यांच्याशी या योजनेशी संबंध जोडताना ते म्हणाले, सूर्यवंशी भगवान श्री रामाच्या प्रकाशातून जगातील सर्व भक्तांना नेहमीच ऊर्जा मिळते. आज अयोध्येतील अभिषेक प्रसंगी माझा संकल्प आणखी दृढ झाला की, भारतीयांनी त्यांच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी. त्यामुळे केंद्र सरकारने १ कोटी घरांवर रुफटॉप सोलर बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली आहे. पीएम मोदी म्हणाले की, त्यांचे सरकार ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करणार आहे. आज अयोध्येतील अभिषेक प्रसंगी माझा संकल्प अधिक दृढ झाला आहे की भारतीयांच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी. म्हणून, अयोध्येहून परतल्यानंतर मी पहिला निर्णय घेतला आहे की आमचे सरकार 1 कोटी घरांवर छतावर सौरऊर्जे बसवण्याचे लक्ष्य घेऊन ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करणार आहे.

पीएम मोदी यांनी अयोध्येहून परत येताच नवी दिल्लीत एक विशेष सभा घेतली, त्यानंतर त्यांनी गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी ही मोठी घोषणा केली. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी होईल. तसेच, ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. दुसर्‍या एक्स पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना घरोघरी रामज्योती लावून प्रभू रामाचे स्वागत करण्याचे आवाहन केले. या आवाहनासोबतच त्यांनी राम मंदिराच्या विधींचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.

दरम्यान, अभिषेक झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी दीपोत्सव साजरा केला. रामललासमोर त्यांनी दीपप्रज्वलन केले. अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनानंतर संपूर्ण देशातच नव्हे तर देशाबाहेरही दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे. अयोध्या ते नेपाळच्या जनकपूरपर्यंत दीपोत्सव साजरा केला जात आहे. देशभरातील लोक त्यांच्या घरांमध्ये आणि व्यावसायिक ठिकाणी दिवे लावत आहेत.

प्रभू रामाच्या अयोध्येत आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी सर्वत्र लोक दिवे लावत आहेत आणि फटाके फोडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पंतप्रधान निवासस्थानी दीपोत्सव साजरा केला. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवर पंतप्रधानांच्या निवासस्थानाची छायाचित्रे शेअर केली आहेत