नवी दिल्ली : भाजपाला सत्तेचा सोपान चढायला मदत केलेल्या अयोध्येतील श्री राममंदिराचे काम वेगाने होत असून येत्या डीसेंबर-जानेवारीत राम मंदिराचा पहीला टप्पा पूर्ण करण्याचा इरादा व्यक्त होत आहे. दिल्लीत संसद भवनाची भव्य इमारत आज लोकार्पण करण्यात आल्यानंतर आता राम मंदिराच्या लोकार्पणाचा बाज उडवून देण्याचा सरकारचा विचार आहे. कारण आज संसदेची नविन इमारत देशाला समर्पित होत असतानाच राम मंदिराच्या निर्मितीची ताजी छायाचित्रे ट्रस्टने जारी केली आहेत.
अयोध्येच्या राम मंदिराचे निर्माण कार्य वेगाने सुरु आहे. राम मंदिराच्या निर्माण स्थळाची ताजी छायाचित्रे समोर आली आहेत. या छायाचित्रात राम मंदिराच्या ग्राऊंड फ्लोअरचे काम पूर्ण झाल्याचे छायाचित्रात दिसत आहे. ही छायाचित्रे श्रीराम मंदिराचे बांधकाम करणाऱ्या श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी समाजमाध्यमावर शेअर केली आहेत. अयोध्येचे राम मंदिर साल 2024पर्यंत भक्तांसाठी सुरु करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
श्री राम मंदिराचा पहिला टप्पा भाविकांसाठी डिसेंबरपर्यंत सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या निर्मिती समितीचे प्रमुख नृपेंद्र मिश्रा यांनी 22 मे रोजी जाहीर केले होते. मिश्रा यांनी म्हटले होते की मंदिराचे काम तीन टप्प्यात सुरू आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर भक्तांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देता येऊ शकणार आहे. पहिल्या टप्प्यात मंदिराचा तळ मजल्यासह ग्राऊंड फ्लोअरवर पाच मंडप बांधण्यात येणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांच्या प्रधान सचिवांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन झाल्याच्या मुहूर्तावर श्री राम मंदिराच्या बांधकाम स्थळाची ताजी छायाचित्रे जारी करण्यात आली आहेत. नवीन संसद भवन 140 कोटी भारतीय नागरिकांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. आज संपूर्ण जग भारताकडे आदर आणि आशेने पहात आहे. जेव्हा भारत पुढे जाते, तेव्हा जग पुढे जाते. देशाच्या विकासात काही क्षण अनमोल असतात,ते कायमस्वरूपी अमर होतात. आजचा दिवस देखील असाच असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.