नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अग्निपथ योजने (Agnipath Scheme) विरोधात देशभरात आंदोलन केलं जात आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि बिहार सारख्या राज्यात या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं. अनेक रेल्वे गाड्या, रेल्वे स्टेशन आणि पोलीस ठाणेही जाळण्यात आलं. त्यामुळे सरकारी मालमत्ता आणि अनेक खासगी मालमत्तांचंही मोठं नुकसान झालं आहे. अशावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी महत्वाचा दावा केलाय. केंद्र सरकारची अग्निपथ योजना खूप चांगली आहे, फक्त लोकांच्या मनात संभ्रम आहे. जसंही लोकांना ही योजना लक्षात येईल, त्यानंतर याला होत असलेला विरोध संपेल. गडकरी पुढे म्हणाले की भारतात लोकशाही (Democracy) आहे. जिथे लोकशाही असते तिथे विरोधी पक्ष आणि सत्ता अशा दोन पक्ष असतात. सत्ता पक्ष जेव्हा एखादी गोष्ट करतो तेव्हा विरोधी पक्षाकडे ती नाकारण्याचा अधिकार असतो. लोकशाहीत हे चालतं. लोकांच्या न्यायालयात जो सर्वसामान्य माणूस असतो तोच अंतिम निर्णय घेतो.
पंतप्रधान मोदींकडून घेण्यात आलेल्या महत्वाच्या योजना आतापर्यंत जनतेलं स्वीकारल्या आहेत. आम्ही पाहतोय की जेव्हा अग्निपथ योजनेची घोषणा करण्यात आली तेव्हापासून देशातील काही राज्यात याला तीव्र विरोध केला जातोय. मी सांगतो की ही रोजगार संपविणारी नाही तर नवे रोजगार निर्माण करणारी योजना आहे. याचा मी व्यवस्थितपणे अभ्यास केलाय आणि ही खूप चांगली योजना आहे. 4 वर्षानंतर कुणीही बेरोजगार होणार नाही. लोकांनी पहिल्यांदा ही योजना योग्य प्रकारे समजून घ्यावी, असं आवाहनही गडकरी यांनी केलंय.
भारतीय लोकशाहीत मी पाहत आलो आहे की देशासमोर अडचणींचा डोंगर आहे. पण काही लोक अडचणींना संधी मानत काम करतात तर काही लोक संधीलाच अडचण समजतात. अशावेळी अडचणींना घाबरुन न जाता त्याचा सामना केला पाहिजे, असंही गडकरी यावेळी म्हणाले.
आता सैन्य भरती ही केवळ अग्निपथ योजनेद्वारेच होईल, असं लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी सांगितलंय. लष्कराच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आलीय. वायू सेनेसाठी 24 जून, नौसेने साठी 25 जून तर लष्करासाठी 1 जुलैपासून भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. सैन्याला युवकांची गरज आहे. आज जवानांचं सरासरी वय 32 आहे. ते कमी करुन आपल्याला 26 वर आणायचं आहे. युवक जास्त धोका पत्करु शकतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. 1989 मध्येच या योजनेवर विचार सुरु करण्यात आला होता. ही योजना लागू करण्यापूर्वी अनेक देशाची सेन्य भरती आणि एक्झिट प्लॅनचा अभ्यास केल्याची माहितीही लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी दिली आहे.