नवी दिल्ली : पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची भाजपाप्रणीत NDA आणि काँग्रेसप्रणीत INDIA ने आतापासून तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी दोन्ही बाजूंकडून बैठकांचे सत्र आहे. काँग्रेसप्रणीत INDIA ची पहिली बैठक बिहार पाटना येथे झाली. त्यानंतर बंगळुरुला दुसरी बैठक आणि आता मुंबईत तिसरी बैठक होणार आहे. त्याची तयारी सुरु आहे. त्याचवेळी भाजपाने सुद्धा छोट्या-छोट्या घटक पक्षांना सोबत घेऊन NDA ची वीण भक्कम करायला सुरुवात केली आहे.
बंगळुरुत INDIA ची बैठक पार पडली. त्याचवेळी दिल्लीत NDA ची बैठक झाली होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील खासदारांना भेटणार आहेत.
मोदींच्या बैठकीला महाराष्ट्रातील किती खासदार उपस्थित राहणार?
भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील महाराष्ट्रातील खासदारांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पंतप्रधान क्लस्टर बैठका घेत आहेत. आज महाराष्ट्र आणि गोव्यातील 48 खासदारांची एकत्रित बैठक होणार आहे.
महाराष्ट्रासाठी भाजपाचा लक्ष्य काय?
सायंकाळी 6 वाजता नवीन महाराष्ट्र सदनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मंत्री नितीन गडकरी, मंत्री राजनाथ सिंह बैठकीला उपस्थित राहणार आहेत. भाजपन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मिशन 45 चा नारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी खासदारांना मार्गदर्शन करतील.
महारष्ट्र खूप महत्त्वाचा आहे
सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वासाठी महाराष्ट्र खूप महत्वाचा आहे. उत्तर प्रदेश खालोखाल महाराष्ट्रातून सर्वाधिक 48 खासदार येतात. महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या दोन वर्षात बऱ्याच उलथापालथी झाल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फुटले. उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट महाविकास आघाडीसोबत आहे. त्याचवेळी शिंदे गट आणि अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी आहे.