नवी दिल्ली : देशात H3N2 इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस सातत्याने वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अलिकडील अहवालावरून असं स्पष्ट करण्यात आले आहे की, H3N2 – इन्फ्लूएंझा विषाणूचा हा उपप्रकार आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर त्याचा उद्रेक होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. खोकला, मळमळ, उलट्या, घसा खवखवणे, ताप, अंगदुखी आणि काही प्रकरणांमध्ये जुलाब ही त्याची लक्षणे आहेत.
त्यामुळे ही लक्षणं असलेल्या रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचे आयएमएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.दिल्लीत फ्लूच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
त्याप्रकरणी एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे की, हा आजारही आता कोरोनासारखाच पसरत आहे.
H3N2 प्रकारचा इन्फ्लूएंझा विषयी बोलताना मेदांता हॉस्पिटलमधील इंस्टिट्यूट ऑफ इंटरनल मेडिसिन रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, H3N2 हा इन्फ्लूएंझा व्हायरसचाच एक प्रकार आहे. तो दरवर्षी या काळात दिसून येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
डॉ. गुलेरिया म्हणाले की, हा एक विषाणू असून तो कालांतराने बदलत जातो. त्याला अँटीजेनिक ड्रिफ्ट असंही म्हटले जाते. ते म्हणाले की, यापूर्वी एक महामारी-एच1एन1 विषाणू आढळून आला होता. तर आता त्याचा प्रसारित ताण H3N2 आहे, म्हणून हा एक सामान्य इन्फ्लूएंझा हाही तेवढाच ताण असून हा आजार कोरोनासारखाच पसरतो आहे.
डॉ. रणदीप गुलेरिया यांनी इन्फ्लूएंझा प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये ताप, घसादुखी, खोकला, अंगदुखी, नाक वाहण्याचे रुग्ण समोर येत आहेत.त्यामुळे दिल्लीतही फ्लूचे रुग्ण वाढत आहेत.
राजधानीतील विविध रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये अशा रुग्णांची सातत्याने वाढ होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. डॉ.गुलेरिया म्हणाले की, अशा परिस्थितीत गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी अधिका काळजी घेणे गरजेचे आहे.
त्यामुळे अशी लक्षणे असलेल्या लोकांनी खबरदारी म्हणून मास्क वापरणे, वारंवार हात धुवावेत असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
याशिवाय सोशल डिस्टन्सही राखला पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले. ज्यांना हा त्रास अति आहे त्यांच्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी इन्फ्लूएंझासाठी लस उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
ज्या वयाच्या लोकांना दम्याचा त्रास आहे, फुफ्फुसाचा गंभीर आजार आहे. अशा लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्याचबरोबर वृद्ध, लहान मुले आणि गर्भवती महिलांना संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.
त्यामुळे लोकांनी गर्दीची ठिकाणे टाळा, हात चांगले धुवा आणि फ्लू विरूद्ध लसीकरण करण्याचा सल्लाही यावेळी देण्यात आला आहे. H3N2 संसर्ग सामान्यतः 50 वर्षांवरील आणि 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये दिसून येत आहे.