नवी दिल्लीः आम्ही आधी कबूतर सोडत असायचो, आता चित्ते सोडतो, अशा आशयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं वक्तव्य सध्या बातम्यांमधून गाजतंय. अनेक वर्षांनंतर प्रथमच देशात चित्ते असल्याचं सामर्थ्य त्यांना वर्णन करायचं होतं. कार्यक्रम होता, गुजरातमधील (Gujrat) डिफेन्स एक्सपोच्या उद्घाटनाचा. पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत देश आधी कबूतर सोडत होता, आता चित्ते सोडण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे. यावरच पलटवार करत AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी लिहिलंय… आणि रेपिस्टही…
असदुद्दीन ओवैसी यांनी बिल्किस बानो केसवरून ही टीका केल्याचं म्हटलं जातंय. गुजरात सरकारने काही दिवसांपूर्वी या केसप्रकरणी ११ दोषींना मुक्त केलं होतं. यावरून भाजपावर प्रचंड टीका होतेय. सुप्रीम कोर्टातही या निकालावर आव्हान देण्यात आलंय.
And rapists… https://t.co/qGCTgAJOQ5
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) October 19, 2022
असदुद्दीन ओवैसी यांनी यापूर्वीदेखील बिल्किस बानो आणि अंकिता मर्डर केस प्रकरणी भाजपवर टीका केलीआहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात अंबाजी येथील सभेत त्यांनी नारी शक्तीवर भाषण केलं होतं. त्यावरही ओवैसींनी ट्विट केलं होतं.
पंतप्रधान महोदय, कृपया बिलकिस बानो आणि अंकिताच्या कुटुंबियांची भेट घ्या, त्यांना तुमच्याशी काही बोलायचं असू शकतं… अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं होतं.
बिल्किस बानो गँगरेप प्रकरणातील दोषींच्या मुक्ततेविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली होती. गुजरात सरकारच्या माफी धोरणानुसार या प्रकरणातील दोषींची सुटका करण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. मात्र गुजरात सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयानेच याला मंजुरी दिली होती, असं कोर्टात सांगण्यात आलंय. दरम्यान, सुप्रीम कोर्टात दोषींविरोधात केलेल्या याचिकेवरच गुजरात सरकारने अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केलाय. या प्रकरणी २९ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी आहे.