मुंबईः अमरनाथ यात्रेला (Amarnath Yatra) गेलेले तीन भाविक बेपत्ता (Devotee Missing) असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील धायरी येथील भोसले कुटुंबातील तिघांशी संपर्क होत नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 15 दिवसांपूर्वी भोसले कुटुंबीय अमरनाथ यात्रेला निघाले होते. धायरीतील महेश भोसले (Mahesh Bhosale), सुनीता भोसले आणि आणखी एक कुटुंबीय असे तिघे पुण्यातून अमरनाथ यात्रेला निघाले होते. मात्र अद्याप त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. पुणे जिल्हा प्रशासनातर्फे भोसले कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
अमरनाथ यात्रेदरम्यान मोठी ढगफुटी झाल्याची बातमी समोर आली आहे. या ढगफुटीत अनेक भाविक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील धायरी परिसरातील भोसले कुटुंबातील तिघांचा संपर्क होत नाहीये. या तिघांपैकी दोघांची नावं कळू शकली आहेत. ती अशी
– महेश भोसले
-सुनीता भोसले
या दोघांची आत्यादेखील त्यांच्यासोबत यात्रेसाठी रवाना झाली होती. यात्रेला निघतानाचा भोसले दाम्पत्याचा फोटो मिळाला असून त्यांच्या यात्रेसाठीचं आयकार्ड, आदी कागदपत्रांचाही फोटो व्हायरल केला जात आहे. ज्यांचा कुणाचा संपर्क भोसले कुटुंबियांशी झाला, त्यांनी त्वरीत पुणे जिल्हा प्रशासनाला कळवावे, असे आवाहान करण्यात आले आहे.
जम्मू काश्मीरमधील अमरनाथ गुहा मंदिर परिसरात शुक्रवारी संध्याकाळी अचानक ढगफुटी झाली. अति मुसळधार पावसामुळे पाण्याचे लोंढे वाहू लागले. या पुरात जवळपास 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. काल रात्रीपासूनच येथे मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरु आहे. तीर्थयात्रेतील आधार छावण्यांमध्येही पाणी घुसले आहे.