सिलीगुडी : ‘ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) जोपर्यंत बंगालच्या जनतेवर करत असलेला अत्याचार, भ्रष्टाचार आणि सिंडिकेट राज्य संपवणार नाहीत, तोपर्यंत भाजपाचा लढा सुरुच राहील’, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली आहे. ममता दीदी तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर तरी सुधारतील असे वाटले होते, मात्र प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे. निवडणूक निकालांनंतर प. बंगालात (West Bengal) जो हिंसाचार झआला त्यानंतर, मानवाधिकार आयोगानेही बंगालमध्ये कायद्याचे राज्य नसल्याचे मान्य केले होते, असेही शाहा म्हमाले. जे सत्तेत आहेत त्यांच्या इच्छेचं राज्य प. बंगालात असल्याची टीका त्यांनी केली. सिलिगुडीत जाहीर सभेत अमित शाहा यांनी ममता दीदींवर जोरदार टीका केली.
नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA वरुनही अमित शाहांनी प. बंगाल सरकारवर जोरदार टीका केली. CAA जमिनीवर प्रत्यक्षात लागू होणार नाही, अशा अफवा तृणमूलकडून पसरवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र कोरोनाचा प्रकोप ओसरल्यानंतर देशात CAA लागू करण्यात येईल, असे शाहा यांनी स्पष्ट केले आहे. CAA लागू होणारच आहे हे तृणमूलच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कान उघडे ठेवून ऐकावे, असेही शाहा म्हणाले. CAA हे वास्तव आहे आणि त्यामुळे घुसखोरी थांबेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेली 2 वर्षे जनतेला मोफत धान्य पुरविले मात्र त्यावर ममता दीदी त्यांच्या स्वत:चा फोटो लावत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. गोरखपूर ते सिलीगुडी पर्यंत 31 हजार कोटी खर्च करुन 545 किलोमीटर रस्त्याचे काम सुरु करण्यात आले, याची आठवणही शाहा यांनी करुन दिली. गोरखा बांधवांकडे केवळ भाजपाचेच लक्ष असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सर्व घटनात्मक मर्यादा लक्षात ठेवून भाजपा गोरखा बांधवांच्या समस्या दूर करेल असेही त्यांनी सांगितले.
संपूर्ण देशाचा विचार केला तर वीजेचे सर्वाधिक दर हे प. बंगालात मोजावे लागतात, देशात पेट्रोलसाठी जास्त दर प. बंगालमध्येच मोजावे लागतात, याची आठवण त्यांनी करुन दिली. ममतादीदींनी प. बंगालला आर्थिक दृष्ट्या कंगाल केल्याची टीकाही त्यांनी केली.
अमित शाहा यांच्या सीएएच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जी यांनी उत्तर दिले आहे. ममता म्हणाल्या- जर त्यांची हीच योजना असेल तर भाजपा संसदेत यावर चर्चा का टाळतायेत. कोणत्याही नागरिकाच्या अधिकारावर गदा येवू नये, हीच आपली इच्छा असल्याचे ममता म्हणाल्या. 2024 मध्ये भाजपा सत्तेत परतणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. निवडणुकांनंतर एका वर्षाने शाहा आले आणि त्यांनी फालतू गोष्टी सांगितल्या, अशी टीका त्यांनी केली. ते गृहमंत्री आहेत त्यांनी दिल्ली आणि इतर राज्यांत चाललेल्या गंभीर बाबींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ममता म्हणाल्या. भाजपा ध्रुवीकरण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.